तृणमूलच्या बंडखोर खासदारांची स्वतंत्र गटाला मान्यता देण्याची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षात विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर 14 दिवसांमध्येच मोठी फूट पडल्याचे स्पष्ट झाले आहे. तृणमूलच्या लोकसभेतील 20 खासदारांनी केलेले बंड उघड झाले आहे. या खासदारांनी 18 मे रोजी लोकसभा अध्यक्षांना पत्र पाठवून स्वतंत्र गट स्थापन करण्याची मागणी केली होती. हे पत्र समोर आले असून त्यावर माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण याच्यासह सायोनी घोष यांच्यासारख्या दिग्गजांनी स्वाक्षरी केली आहे.

प. बंगालमध्ये विधानसभेच्या 80 पैकी 58 आमदारांनी 3 जूनला बंडखोरी केल्यानंतर स्वतंत्र गटाला मान्यता देण्याची मागणी विधानसभा अध्यक्षांकडे केली होती.

काही खासदारांच्या स्वाक्षऱ्यांवर संशय

19 खासदारांची स्वाक्षरी असलेल्या पत्रावर काही खासदारांच्या नावासमोर स्वाक्षरी दिसत नाही, तर काही खासदारांच्या स्वाक्षऱ्यांचा भाग या छायाचित्रांमध्ये ब्लर केला आहे. त्यामुळे या पत्रावर संशय व्यक्त करण्यात येत आहे.

या खासदारांनी केले बंड

बंडखोर खासदारांमध्ये काकोली घोष दस्तीदार, सायोनी घोष, शताब्दी रॉय, युसूफ पठाण, जगदीश बर्मा बसुनिया, खलीलुर रहमान, अबू ताहेर खान, पार्थ भौमिक, दीपक अधिकारी, कालीपद सोरेन, जून मालिया, अरुप चक्रवर्ती, शर्मिला सरकार, प्रसून बंदोपाध्याय, बापी हलदार, रचना बॅनर्जी, असित कुमार माल, माला रॉय आणि मिताली बाग यांचा समावेश आहे.

बंडखोर खासदार सोमवारी लोकसभाध्यक्षांना भेटणार

तृणमूलच्या खासदारांनी बंड करून वेगळा गट स्थापन केल्याचे बंडखोरांपैकी एक जगीश बर्मा बासुनिया यांनी स्पष्ट केले. आमच्या गटाला त्यांना मान्यता देण्यासाठी आम्ही लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना सोमवारी भेटणार आहोत, असे बासुनिया म्हणाले.