
संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने मल्टी-लेयर्ड बॅलिस्टिक मिसाईल डिफेन्स प्रणाली आणि नौदलाच्या अत्याधुनिक मध्यम पल्ल्याच्या जहाजविरोधी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे. 10 आणि 11 जून रोजी या चाचण्या घेण्यात आल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली आहे. या चाचण्यांमुळे हिंदुस्थानची संरक्षण सज्जता आणि शत्रूच्या क्षेपणास्त्रांना हवेतच रोखण्याची क्षमता अधिक मजबूत झाली आहे. या यशस्वी चाचण्यांमुळे चीन आणि पाकिस्तानला धडकी भरली आहे.
डीआरडीओने विकसित केलेल्या या मल्टि-लेयर्ड बॅलिस्टिक मिसाईल डिफेन्स प्रणालीने चाचणीदरम्यान नियुक्त लक्ष्यांचा अचूक वेध घेत त्यांना हवेतच भुईसपाट केले. या चाचणीच्या यशामुळे हिंदुस्थान आता जगातील अशा निवडक एलिट देशांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे, ज्यांच्याकडे ‘इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल’ म्हणजेच दुसऱ्या खंडातून येणाऱ्या महाविनाशकारी क्षेपणास्त्रांनाही हवेतच नष्ट करण्याची अफाट क्षमता आहे. यामुळे शत्रू राष्ट्राने डागलेले कोणतेही क्षेपणास्त्र आता हिंदुस्थानच्या सीमेत शिरण्यापूर्वीच नष्ट केले जाईल.
डीआरडीओने नेव्हल अँटी-शिप मिसाईल-मीडियम रेंज या मध्यम पल्ल्याच्या जहाजविरोधी क्षेपणास्त्राची पहिली उड्डाण-चाचणी घेतली. हे क्षेपणास्त्र नौदलाच्या ताफ्यात सामील झाल्यानंतर हिंदुस्थआनी सशस्त्र दलांना सागरी सुरक्षेसाठी एक आधुनिक आणि अधिक प्रभावी पर्याय उपलब्ध होणार आहे. यामुळे सागरी क्षेत्रातील हिंदुस्थानची पकड अधिक मजबूत होईल.
Ministry of Defence, Government of India (@SpokespersonMoD) posts, “DRDO successfully demonstrated a multi-layered Ballistic Missile Defence system and conducted the maiden flight-test of the Naval Anti-Ship Missile–Medium Range, marking a major boost to India’s defence… pic.twitter.com/bR7g4ruYIm
— Press Trust of India (@PTI_News) June 13, 2026
दरम्यान, या संपूर्ण चाचण्यांचे थेट संनियंत्रण संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव तथा डीआरडीओचे अध्यक्ष राजेश कुमार सिंह यांनी केले. शास्त्रज्ञ, अभियंते आणि उद्योग भागीदार यांच्या संयुक्त प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही या ऐतिहासिक कामगिरीबद्दल डीआरडीओ आणि भारतीय सशस्त्र दलांच्या टीमचे अभिनंदन केले आहे.





























































