
समुद्रकिनारा साफ करणाऱ्या यंत्राखाली चिरडून एका महिला सफाई कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना मुंबईतील जुहू बीचवर घडली. अंगम्मा देवेंद्र असे मयत महिला कामगाराचे नाव आहे. साफसफाईच्या कामासाठी नियुक्त केलेल्या एका खासगी एजन्सीकडे त्या काम करत होत्या. या घटनेमुळे सफाई कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
लोकमत टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, जुहू बीचवर नियमित साफसफाईचे काम सुरू असताना शुक्रवारी सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाने साफसफाईसाठी वापरल्या जाणाऱ्या बॉबकॅट यंत्राजवळ मयत महिला कामगार उपस्थित होता. याचदरम्यान हा अपघात घडला. ही घटना नेमकी कशी घडली याबाबत अधिकारी चौकशी करत आहेत.
ऑपरेटरने मनाई करूनही संबंधित कामगार ‘बॉबकॅट’ यंत्राच्या ‘बकेट’ (पात्राच्या) भागात बसल्या होत्या. यंत्र एका खड्ड्यात गेल्यामुळे कामगाराचा तोल गेला आणि त्या बकेटमधून खाली पडल्या. त्यानंतर, चालत्या वाहनाखाली चिरडून त्यांचा मृत्यू झाला, असे प्राथमिक तपासात कळते.


























































