
<< मंगेश वरवडेकर
जगात अशी काही राष्ट्रं असतात, ज्यांच्या नशिबातच ‘लढणं’च लिहिलेलं असतं. त्यांच्या सीमेवर तोफा थंडावत नाहीत आणि तरीही त्यांच्या पायातला चेंडू थांबत नाही. इराण तसलंच एक राष्ट्र. एकीकडे घरावर अमेरिकन ड्रोनचे सावट, तेलाच्या विहिरींवर बॉम्बचे वादळ आणि दुसरीकडे त्याच अमेरिकेच्या भूमीवर, लॉस एंजेलिसच्या सोफी स्टेडियमात इराणचे अकरा जण ‘गोल’ नावाचा बॉम्ब टाकायला सज्ज झालेत. 16 जूनची सकाळ फक्त फुटबॉलची नसेल, ती असेल जिद्दीची, स्वाभिमानाची आणि ‘आम्ही जिवंत आहोत’ हे जगाला ठणकावून सांगण्याची.
ही गोष्ट फक्त फुटबॉलची नाही. हा माणसाच्या चिवटपणाचा जाहीरनामा आहे. जरा विचार करा तुमच्या गावावर क्षेपणास्त्रं कोसळतायत, तुमच्या बायका-पोरं बंकरमध्ये लपलीयत, तुमच्या चलनाची राख झालीय… अशा वेळी तुम्ही परदेशात जाऊन, त्याच शत्रूच्या प्रेक्षकांसमोर, 90 मिनिटं पळायचं, झुंजायचं, जिंकायचं. हे इराणच करू शकतो. कारण ‘टीम मेली’च्या रक्तातच पेटलेपण आहे. 1980 च्या इराक युद्धातही त्यांनी विश्वचषक गाजवला होता. आज इतिहासाची पुनरावृत्ती आहे, फक्त शत्रू बदललाय आणि रणभूमीचं नाव ‘लॉस एंजेलिस’ आहे. न्यूझीलंडविरुद्धचा सामना हा इराणी संघासाठी डावपेचांचा नव्हे, अस्मितेचा लढा असेल. कागदावर न्यूझीलंड दिसतो साधा.
‘ऑल व्हाईट्स’ची बचावफळी शिस्तीची, क्रिस वुड हवेतला बादशहा. पण इराणच्या समोर कागदी वाघ टिकत नाहीत. कारण इराण उद्या खेळणार नाही, पेटून उठणार आहे. तो पेटला तर समोरच्याची राख नक्कीच समजा.
एका अजब वातावरणात सुरू होणाऱ्या सामन्याची सुरुवातीची 15 मिनिटे वेगळीच असतील. वादळापूर्वीची शांतता नाही, वादळच असेल ते. घालेनोईंचा इराण पहिल्या शिट्टीपासून न्यूझीलंडच्या अंगावर धावून जाईल. युद्धातला राग, अपमानाचा अंगार, तो सगळा अझमून आणि तारेमीच्या पायातून बाहेर पडेल. किवींची बचावफळी ‘बस पार्क’ करायच्या आतच त्यांच्या बसमध्ये गोल शिरलेला असेल. हा मानसिक आघात आहे, ‘आमचं घर जळतंय, पण आमची स्वप्नं नाही’ हे सांगणारा त्यांचा खेळ त्यांनाच नव्हे तर जगाला अपेक्षित आहे. इराणच्या मिडफिल्डवर सारंकाही असेल. त्यांनी मैदानाचा ताबा घेतला म्हणजे युद्धावर त्यांचाच ताबा असेल. सईद एझातोलाही आणि सामान घोड्डोस ही जोडी उद्या फक्त पास देणार नाही, तर किवींच्या प्रत्येक हालचालीवर पहारा ठेवेल. न्यूझीलंडला मोकळा श्वास घेऊ द्यायचा नाही, हाच इराणचा प्लॅन असेल. कारण त्यांना माहितेय, 1-0 ने जिंकलं तरी जग म्हणेल ‘इराण हरला.’ त्यांना दणक्यातच जिंकायचंय. हेच त्यांना जगालाही दाखवून द्यायचेय.
इराणचा गोलकीपर बिरानवंदचा एक थ्रो थेट समोरच्या डीमध्ये पोहोचतो. 2018 ला त्याने रोनाल्डोला रोखलं होतं. उद्या क्रिस वुडच्या हेडरसमोर हीच भिंत उभी राहील. आणि काऊंटरवर तारेमी सुसाट सुटेल. हे युद्ध बचाव आणि प्रतिहल्ला याचेच आहे. इथे हल्ले दोन्ही बाजूंनी होणार, जो आक्रमकताही दाखवेल आणि बचावही करेल, तोच हे युद्ध जिंकणार.
हे दुर्मिळ आहे, कारण…
जगाच्या इतिहासात अशी उदाहरणे बोटावर मोजण्याइतकीच आहेत. 1992 ला युद्धग्रस्त युगोस्लाव्हियाने युरो कप जिंकला होता. 1998 ला क्रोएशियाने राखेतून उठून तिसरा क्रमांक पटकावला होता. इराण उद्या तेच करतंय. त्यांचे खेळाडू मैदानात उतरताना फक्त जर्सी घालणार नाहीत, ते नऊ कोटी इराणींच्या आशा-अपेक्षांचं ओझं पाठीवर घेऊन मैदानात उतरणार आहेत. ते जेव्हा राष्ट्रगीत म्हणतील, तेव्हा ते सूर नसतील, तर हुंदके असतील आणि जेव्हा गोल करतील, तेव्हा तो जल्लोष नसेल, तो एक आक्रोश असेले, ‘आम्हाला संपवायला निघालात, पण आम्ही इथेच आहोत.’
न्यूझीलंडला कदाचित वाटेल, हा फक्त एक साखळी सामना आहे. पण इराणसाठी ही ‘फायनल’ आहे. कारण त्यांच्यासाठी प्रत्येक सामना शेवटचा असू शकतो. देशात काय होईल, उद्या संघ परत जाऊ शकेल की नाही, याची शाश्वती नाही. म्हणूनच ते प्रत्येक सेपंद जीव तोडून खेळतील. त्यांची हे जीवघेणे युद्ध प्रत्येक सामन्यात सुरूच असेल. जिंकू किंवा मरू, शत्रूसंगे युद्ध आमचे सुरू…
त्यामुळे उद्या सकाळी लॉस एंजेलिसमध्ये फक्त चेंडू फिरणार नाही, तर एका जखमी राष्ट्राचा स्वाभिमान फिरेल. तोफांचे आवाज गोलच्या कल्लोळात विरून जातील का? कदाचित नाही. पण 90 मिनिटांपुरता तरी इराण जगाला सांगेल, ‘तुम्ही आमची शहरं उद्ध्वस्त करू शकता, पण आमची जिगर नाही.’ उद्या हाच जिगर अवघं जग
फुटबॉलच्या मैदानात पाहील. म्हणूनच, हा सामना इराण हरला तरी जिंकलेलाच असेल. पण तो जिंकलाच तर… तर ते फक्त तीन गुण नसतील. ते असेल युद्धाच्या काळोखात पेटलेल्या विजयाची एक मशाल.
























































