बिहारमध्ये शिपाई भरतीत तुफान दगडफेक; उमेदवारांचे आंदोलन, ट्रेन थांबवल्या, पोलिसांकडून लाठीचार्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
bihar-constable-exam-protest-stone-pelting-at-patliputra-station-trains-stopped-police-lathicharge

बिहारमध्ये रविवारपासून शिपाई भरती परीक्षा सुरू झाली आहे. परीक्षा सुरू होण्यापूर्वी पाटलीपुत्र रेल्वे स्थानकावर उमेदवारांनी रेल्वे गाडय़ांची पुरेशी व्यवस्था नसल्याने संतापून रेल्वे रुळांवर आंदोलन केले. संतप्त उमेदवारांनी अनेक गाडया थांबवल्या. दगडफेक केली आणि परीक्षा विशेष गाडीची तोडफोडही केली. याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज आणि अश्रुधुराचा वापर केला.

घटनास्थळी पोहोचलेल्या पाटणाचे जिल्हाधिकारी डॉ. त्यागराजन यांनी सांगितले की, मध्यरात्रीच्या सुमारास आम्हाला माहिती मिळाली की काही लोक गोंधळ घालत आहेत. आम्ही त्यांना विनंती केली की त्यांनी गोंधळ घालू नये आणि परीक्षा देऊ इच्छिणाऱया परीक्षार्थींना सहकार्य करावे. काही समाजकंटकांनी वारंवार आपत्कालीन साखळी ओढली आणि विशेष गाडय़ांची मागणी यासारख्या विविध मागण्या केल्या, तर आधीच दोन विशेष गाडय़ा चालवण्यात आल्या होत्या. आंदोलकांनी जाणाऱया विद्यार्थ्यांनाही अडवले. या कारणांमुळे आम्हाला हलका बळाचा वापर करावा लागला.

बक्सर रेल्वे स्टेशनवर गर्दी

गाडय़ा पकडण्यासाठी बक्सर स्टेशनवर उमेदवारांची मोठी गर्दी जमली. कॉन्स्टेबल भरती परीक्षा देण्यासाठी आलेले विद्यार्थी कोणत्याही मार्गाने ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे आरक्षण असलेले प्रवासीही ट्रेनमध्ये चढू शकले नाहीत.