
स्वित्झर्लंड विरुद्ध कतार सामना 1-1 बरोबरीत सुटला, पण 90 मिनिटांचा खेळ 14 व्या मिनिटाच्या एका निर्णयावर भारी पडला. प्रकरण होतं पेनल्टीचं, त्याहून कडी म्हणजे वार च्या ‘गायब’ झालेल्या थ्री डी ग्राफिक्सची. कतारने विदेशी भूमीवर पहिला ऐतिहासिक गुण मिळवला खरा, पण चर्चेचा चेंडू मात्र वारच्या कोर्टातच घुटमळतोय.
14 व्या मिनीटाला कतारचा गोलकीपर महमूद अबुनाडा आणि स्विस खेळाडू रेमो र्फ्यूलर यांची टक्कर. पंचाने थेट बोट पेनल्टी स्पॉटवर रोखलं. पण टीव्ही रिप्लेमध्ये दिसल, फाऊलच्या आधी र्फ्यूलर ‘ऑफसाईड’ असावा! मग वारने तपासणी केली, पेनल्टी कायम ठेवली. नेहमीप्रमाणे सेमी-ऑटोमेटेड ऑफसाईडचं थ्री डी अॅनिमेशन यायला हवं होतं, जेणेकरून दूध का दूध, पानी का पानी झालं असतं. पण स्क्रीनवर आला सन्नाटा, ग्राफिक्सच गायब आणि इथूनच सुरू झाला गदारोळ.
वाद वाढताच फिफाने तातडीने पत्रक काढलं. 14 व्या मिनिटाला छोटी तांत्रिक अडचण आल्याने ऑनसाईड ग्राफिक बनू शकलं नाही. मात्र ती चूक लगेच दुरुस्त केली. याचा वारच्या कामावर किंवा पंचाच्या निर्णयावर काडीचाही परिणाम झाला नाही. आमच्या लाईन्सने दोन्ही वेळा खेळाडू ऑनसाईडच होता हे सिद्ध केलंय.

























































