
यंदाच्या हंगामात रोहिणी नक्षत्र कोरडे गेल्यानंतर मृग नक्षत्राचेही पाच ते सहा दिवस उलटले, तरी मान्सूनने अपेक्षित गती पकडलेली नाही. परिणामी, खरीप हंगाम संकटाच्या उंबरठ्यावर उभा राहिला आहे. पावसाअभावी पेरण्या रखडल्या असून शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं राहिले आहे. मृग नक्षत्र सुरू होऊनही पावसाच्या सरी कोसळल्या नसल्याने पेरण्यांवर मोठा परिणाम झाला आहे. पाऊस पडत नसल्याने खरीप हंगामातील पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत. मे महिन्याच्या अखेरपर्यंत शेतीच्या मशागतीची सर्व कामे उरकून बळीराजा पेरणी सज्ज झाला होता. मात्र अद्यापही पाऊस पडत नसल्याने खरीप दुष्काळाच्या छायेत बळीराजाची चिंता चांगलीच वाढली आहे. एल निनोमुळे राज्यात मान्सून लांबणीवर पडल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. जून अर्धा संपला तरी पाऊस पडत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. मागील दोन तीन वर्षामध्ये मृग नक्षत्रात चांगला पाऊस पडल्याने पेरण्या वेळेवर झाल्या होत्या. त्यामुळे खरीप पिके ही दमदार आली होती.
मात्र यंदा खरीप हंगामाच्या तोंडावर अद्यापही पाऊस न झाल्याने शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे. गेल्या आठवडाभरापासून तालुक्यात ढगाळ वातावरण निर्माण होत असले तरी दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. दुपारनंतर व सायंकाळी आकाशात काळ्या ढगांची गर्दी होत असल्याने शेतकऱ्यांच्या आशा उंचावत आहेत; मात्र ढग विरून जात असल्याने अपेक्षित पाऊस होत नाही.
सध्या उन्हाळा सारखं रखरखतं ऊन आणि प्रचंड गर्मी वाढली आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच बळीराजाच्या आशा-अपेक्षांवर पाणी फिरत असल्याचे चित्र आहे. खरीप हंगामाची पूर्वतयारी पूर्ण झाली असून शेतकऱ्यांनी शेतजमिनीची मशागत, नांगरणी, वखरणी, बांधबंदिस्ती यांसह पेरणीपूर्व सर्व कामे पूर्ण केली आहेत. काही शेतकऱ्यांनी सोयाबीन, कापूस, तूर, मूग, आदी पिकांसाठी बियाणे आणि खतांची खरेदी करून ठेवली आहे. काहींनी कर्ज काढून शेतीची तयारी केली असल्याने आता केवळ दमदार पावसाची प्रतीक्षा शिल्लक राहिली आहे. सध्या अनेक शेतकरी ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेतीची अंतिम मशागत करत असून, पाऊस पडताच पेरणी करण्यासाठी सज्ज आहेत. मात्र समाधानकारक पाऊस न झाल्यास पेरणी उशिरा होण्याची शक्यता आहे. पेरणी लांबल्यास उत्पादनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात असून विशेषतः सोयाबीन उत्पादक शेतकरी वेळेत पावसाची अपेक्षा बाळगून आहेत.
दरम्यान, वातावरणातील सातत्याने होणाऱ्या बदलांमुळे शेतकरी संभ्रमावस्थेत आहेत. सकाळी उन्हाचा कडाका आणि दुपारी ढगाळ वातावरण, अशा बदलत्या हवामानाचा शेती नियोजनावर परिणाम होत आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार नैऋत्य मान्सूनची आगेकूच सुरू असून तो महाराष्ट्राच्या दिशेने वेगाने सरकत आहे. पुढील काही दिवसांत मान्सून राज्यातील बहुतांश भाग व्यापण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. लवकर पाऊस झाल्यास खरीप हंगामाला मोठा दिलासा मिळणार असून, शेतीची कामे वेगाने मार्गी लागतील. त्यामुळे सध्या बळीराजा आकाशाकडे डोळे लावून बसला असून पावसाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहे. पुढील आठवडा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून मान्सूनच्या दमदार हजेरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शेतकऱ्यांचे लक्ष आता आभाळाकडे…
खरीप हंगामाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या शेतकऱ्यांसमोर सध्या अनेक आव्हाने आहेत. पाऊस लांबल्याने पेरणी रखडली आहे, खतांचे दर वाढले आहेत आणि एल-निनोच्या सावटामुळे पुढील हवामानाबाबतही साशंकता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष आता आभाळाकडे लागले असून चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत बळीराजा दिवस मोजत आहे.
पैठण मुख्य डावा कालवा बंद
आठ पैठण मुख्य डाव्या कालवा सतत महिन्यांपासून सतत वाहत होता, पावसाळा लागूनही पाऊस पडला नसल्याने डावा कालव्याचे पाणी बंद झाल्याने डाव्या कालव्याच्या पाण्यावर लावलेल्या हजोरो हेक्टर ऊस क्षेत्र धोक्यात सापडले आहे, पाऊस वेळेवर पडला नाही तर त्या उसाचे पाचट होण्याची भीती निर्माण झाली आहे.
हवामानाचा अंदाज घेऊन पेरणी करावी…
शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन पेरणीचे नियोजन करावे. पुरेसा पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी. घाईघाईने पेरणी केल्यास उगवण क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना सातत्याने मार्गदर्शन केले जात आहे, असे तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब गंडे यांनी सांगितले.


























































