लाद्या उखडल्या, शौचालयांची दुरवस्था; डोंबिवली बनले गैरसोयींचे ‘स्थानक’, शिवसेनेचा रेल्वे प्रशासनाला आंदोलनाचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रवेशद्वारावरच असलेला राडारोडा, उखडलेल्या लाद्या, शौचाल यांची दुरवस्था आणि गर्दुल्ले व चोरट्यांचा वार यामुळे डोंबिवली रेल्वे स्थानक गैरसोयींचे ‘स्थानक’ बनले आहे. लवकरात लवकर येथील समस्या दूर कराव्यात अन्यथा मोठे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवसेनेने रेल्वे प्रशासनाला दिला आहे.

डोंबिवली हे महत्त्वाचे स्थानक असून तेथील प्रवाशांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. रोज लाखो प्रवासी या स्थानकातून प्रवास करतात. पण त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. यासंदर्भात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे डोंबिवली पश्चिम शहरप्रमुख सुरेश परदेशी, उपशहरप्रमुख प्रमोद कांबळे, ज्येष्ठ शिवसैनिक राजू पवार यांच्या शिष्टमंडळाने स्टेशन मॅनेजर शुक्ला यांची भेट घेतली. तसेच विविध समस्यांचे निवेदन देऊन त्यांचे लक्ष वेधले.

या आहेत समस्या

डोंबिवली प्लॅटफार्मवर सरकते जिने, लिफ्ट तसेच ब्रीजची कामे सुरू असल्याने सर्वच प्रवेशद्वारांवर खड्डे, दगड-माती व राडारोडा अस्ताव्यस्तपणे पडला आहे.

पावसाळ्यात डबके साचून महिला प्रवासी तसेच वृद्ध, लहान मुले त्यात पडू शकतात. सरकत्या जिन्यांजवळ लाद्या उखडल्या आहेत.

सर्व फलाटांवरील शौचालयांची दूरवस्था झाल्याने महिला, दिव्यांग प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. तसेच स्कायवॉकवर असलेले दिवे रात्री बंद असतात.