रोखठोक – अयोध्येतील दरोड्याची गोष्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंतप्रधान मोदी यांच्या काळात अयोध्येवरच दरोडा पडला. श्रीरामांची दानपेटीच लुटली. लुटणारे पाकडे वगैरे नाहीत, तर भाजप परिवारातले लोक आहेत. सत्यवचनी श्रीरामांना ज्यांनी बोट धरून अयोध्येत आणले त्या श्रीरामांनी पुन्हा वनवासात जावे असे देशातले वातावरण आहे.

पंतप्रधानपदी मोदी आहेत तोपर्यंत सर्व काही ‘मुमकीन’ आहे याची खात्री आता प्रत्यक्ष प्रभू श्रीरामांनाही पटली असेल. अयोध्येतील राममंदिरास हिरव्या दहशतवाद्यांपासून धोका असल्याच्या बातम्या उडवल्या जातात, पण प्रत्यक्षात हा धोका भारतीय जनता पक्षाच्याच लोकांकडून आहे. राममंदिराच्या दानपेटीतून सुमारे पाच कोटी रुपयांचा अपहार झाला आहे ही बाब धक्कादायक आहे. दर्शनासाठी येणारे भाविक आपापल्या ऐपतीनुसार दानपेटीत धनराशी टाकत असतात. त्यातील किमान पाच कोटी रुपयांचा अपहार झाला आहे. समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी अयोध्येतील चोरीचे हे प्रकरण समोर आणले. “राममंदिर ट्रस्टच्याच एका प्रमुख व्यक्तीने या चोरीची माहिती दिली. श्रीराम त्यांचे भले करो,” असे श्री. यादव म्हणाले. भाजपच्या लोकांनी श्रीरामांनाही सोडले नाही व त्यांनाही लुटले. ज्या श्रीरामांच्या नावावर राजकारण केले, मते मागितली, त्या श्रीरामांच्या तिजोरीवर ‘हात’ मारण्याचा हा प्रकार घृणास्पद आहे. अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीवर प्रभू श्रीरामांच्या प्रतिष्ठापनेच्या वेळी भव्य सोहळा केला. स्वतः पंतप्रधान मोदी मंदिराच्या गर्भगृहात दहा-बारा दिवस राहिले. त्यांनी व्रत-वैकल्य केले. त्याच वेळी भारतभर त्यांच्या अंधभक्तांनी जाहिरातबाजी केली. खास गाणी रचली, त्यात काय म्हटले?

जो राम को लाए हैं, हम उनको लाएंगे
जो राम को लाए हैं, हम उनको लाएंगे
दुनिया में फिरसे हम
भगवा लहराएंगे…

पंतप्रधान मोदी बाल श्रीरामाचे बोट धरून अयोध्येत निघाले आहेत, अशी पोस्टर्स त्यावेळी झळकली तेव्हा धक्का बसला होता. श्रीराम अयोध्येत आले ते फक्त मोदींमुळे हे सांगण्याचा हा प्रकार होता. मग त्याच श्रीरामांच्या दानपेटीतले पाच-सात कोटी आता गायब झाले, हे कसे? ‘न खाऊंगा, न खाने दूंगा’ ही मोदींची गर्जना अयोध्येतच फोल ठरली.

काय केले?

मोदींना पंतप्रधानपदी येऊन 12 वर्षे झाली. या 12 वर्षांत मोदींकडून देशासाठी कोणते भरीव कार्य झाले? भ्रष्टाचार संपूर्ण उखडून टाकण्याचा वायदा करून ते आले व या 12 वर्षांत इतिहासातील सगळ्यात मोठा भ्रष्टाचार झाला. भारतात रोज सरासरी शंभर कोटींचे ‘बँक फ्रॉड’ होतात व हे सर्व लोक मोदींच्या गुजरातशी संबंधित आहेत. राजेश मेहता या मोदी मित्राने तर 15 लाख कोटींचा बँक फ्रॉड केला आणि सरकारला त्याची भनकही लागली नाही. जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या मोठ्या अर्थव्यवस्थेचे हे हाल आहेत. प्रभू श्रीरामांच्या शपथेवर प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख टाकण्याचे वचन मोदींनी दिले, पण गुजरातचा एकटा राजेशभाई 15-15 लाख कोटी उडवून गेला. 12 वर्षांत मोदींनी काय केले, तर असे अनेक राजेशभाई त्यांनी उभे केले. 12 वर्षांत श्रीरामांचे मंदिर उभे राहिले, पण या रामराज्यातले स्वातंत्र्य, बंधुभाव, लोकशाही नष्ट केली गेली. त्यादृष्टीने 12 वर्षांत भारतीय रामराज्याचा पूर्ण नरक झाला. राममंदिरातील दानपेटीची लूट ही प्रतीकात्मक आहे. जनतेची लूट, सार्वजनिक संपत्तीची लूट रोजचीच सुरू आहे. अयोध्येत श्रीराम वनवासात गेले तेव्हा भरताने सिंहासनावर श्रीरामांच्या पादुका ठेवून राज्य केले व श्रीराम वनवासातून येताच अयोध्या श्रीरामांच्या स्वाधीन केली. इथे काय सुरू आहे? जणू सिंहासनावर एका गौतमभाईंच्याच पादुका आहेत व मोदी-शहा रोज पाद्यपूजा करीत आहेत. ज्या देशात मोदी जातात त्या देशात अदानी यांना मोठे कंत्राट मिळते व तेथे अदानींचा नवा उद्योग सुरू होतो, हे काही रामराज्याचे लक्षण नाही. सर्व नियम, कायदे, वचने मोडून एकाच व्यक्तीची भरभराट 12 वर्षांत झाली. अयोध्येत श्रीराम यासाठीच आणले काय?

निवडणुकांचा फार्स!

मोदी यांच्या राज्यात काय सुरू आहे? देशातली प्रत्येक निवडणूक हा केवळ फार्स ठरला आहे. महाराष्ट्र, प. बंगालसारख्या राज्यांतील निवडणुकांचीच चोरी झाली. हे श्रीरामांच्या दानपेटीवरच दरोडा टाकण्यासारखे आहे. आम्ही श्रीरामांना अयोध्येत घेऊन आलो म्हणून त्यांच्या दानपेटीवर दरोडा टाकण्याचा अधिकार आम्हाला आहे. कोणी जाब विचारला तर त्याला देशद्रोही ठरवू अशा मस्तीत भाजपचे लोक आहेत. सत्ता माणसाला विनम्र बनवते. भारतात मोदी व त्यांच्या लोकांना पाशवी सत्तेने सैतान बनवले. लोकशाहीतली एकही मर्यादारेषा ते पाळायला तयार नाहीत. रामायणातील लक्ष्मणरेषेवर तर त्यांनी कधीच तंबाखूची गुळणी टाकली. भारतीय निवडणुकांचा आणखी एक अघोरी खेळ मध्य प्रदेशात झाला. तेथील काँग्रेसच्या राज्यसभा उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्जच रिटर्निंग ऑफिसरने बाद केला. तेलंगणातील एका गुन्हेगारी केसची माहिती त्यांनी लपवली हे कारण दिले. मुळात तेलंगणातील एका प्रकरणात पोलिसांनी नटराजन यांना फक्त ‘शो कॉज’ म्हणजे कारणे दाखवा नोटीस दिली. तो गुन्हा ठरत नाही. राज्यसभेची उमेदवारी बाद करण्याइतका तो गंभीर गुन्हा नाही. त्याच वेळी झारखंडमधील भाजपपुरस्कृत उमेदवार परिमल नाथवानी यांना त्यांच्या उमेदवारी अर्जातील चुका दुरुस्त करण्यासाठी 24 तासांची मुदत वाढवून दिली. काँग्रेसच्या सामान्य उमेदवाराला एक न्याय व भाजपपुरस्कृत उद्योगपती उमेदवाराला विशेष न्याय. निवडणूक आयोगाची ही हरामखोरी आहे. स्वतः मोदी यांनी अनेक निवडणुकांत स्वतःची वैयक्तिक व कौटुंबिक माहिती लपवली. तरी त्यांचे अर्ज वैध ठरवले, पण मीनाक्षी नटराजन यांची उमेदवारीच चोरी झाली. मीनाक्षी नटराजन या वागण्यात व जगण्यात गांधीवादी आहेत. त्यांचे सारे जीवन देशसेवेत गेले. त्या प्रामाणिक आहेत. काँग्रेस पक्षाने 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी त्यांना उमेदवारी दिली. खर्चासाठी पाच कोटी रुपये दिले. निवडणुकीत त्या पराभूत झाल्या, पण निवडणूक संपताच चार कोटी रुपये त्यांनी पक्षाच्या तिजोरीत जमा केले. एका पैशाचाही अपहार केला नाही. अशा प्रामाणिक उमेदवाराचा अर्ज जबरदस्तीने बाद करायला लावणे हीच मोदी यांची 12 वर्षांतील तपश्चर्या आहे. चोर, दरोडेखोरांना पूर्ण सूट, पण गांधीवादी, प्रामाणिक मीनाक्षी नटराज यांना राज्यसभेत येण्यापासून रोखले, हे असे मोदींचे रामराज्य. त्यांचा ‘राम’ वेगळा आहे. सत्यवचनी श्रीरामांचे बोट त्यांनी धरले असते तर तो खरा ‘राम’ मोदींचे बोट सोडून निघून गेला असता. 12 वर्षांत भारताच्या भूमीवरील पापाचे ओझे वाढले आहे. मंदिरातील देवांनाही डुलकी लागली आहे किंवा त्यांनी डोळे मिटून घेतले आहेत. श्रीरामांची तिजोरी जेथे लुटली गेली तेथे डोळे उघडे ठेवून तरी देवांनी काय करायचे? 12 वर्षांत मोदी यांनाच लोकांनी देव बनवले. त्यामुळे मंदिरातील खऱ्या देवांना काम उरले नाही.

कसला विक्रम?

मोदी हे 12 वर्षे पंतप्रधानपदावर विराजमान आहेत. हा संपूर्ण काळ खोटे बोलण्यात व खोटे वागण्यात गेला. नेहरूंचा विक्रम मोडला ही त्यांची बतावणीदेखील खोटेपणाच आहे. जवाहरलाल नेहरू 15 ऑगस्ट 1947 ला पंतप्रधान झाले आणि 27 मे 1964 पर्यंत ते त्या पदावर होते.

म्हणजे 16 वर्षे 9 महिने 12 दिवस. नरेंद्र मोदी 26 मे 2014 ला पंतप्रधान झाले आणि 10 जून 2026 लाही ते या पदावर आहेत.

म्हणजे 12 वर्षे 15 दिवस.

पंडित नेहरूंचा कोणता विक्रम त्यांनी मोडला?

सत्यवचनी श्रीरामांच्या देशात 12 वर्षे असत्य भांगेची रोपटीच उगवली.

काय हा विक्रम? काय हे योगदान? प्रभू श्रीराम एक दिवस अयोध्येचा त्याग करतील. यापेक्षा वनवास बरा असे सांगतील.

चला, प्रभू श्रीरामांना अयोध्या सोडण्यापासून रोखू या.

Twitter – @rautsanjay61

Gmail- [email protected]