
पश्चिम बंगालमध्ये ४,००० ईव्हीएम जळाल्याप्रकरणी आणि नीट पेपरफुटीवरून काँग्रेस नेते इम्रान मसूद यांनी भाजपवर हल्ला चढवला आहे. ते म्हणाले की, देशातील लोकशाही नष्ट केली जात आहे. सध्या राजकीय पक्षांवर हल्ले केले जात आहेत आणि देशात हुकूमशाही आणण्याची तयारी सुरू आहे. त्यामुळे आपण आज जागे झालो नाही तर हे कधीच थांबणार नाही आणि पुढील परिस्थिती आणखी बिकट होईल, असा धोक्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
ते पुढे म्हणाले, जर आपण आज जागे झालो नाही तर हे कधीच थांबणार नाही. पश्चिम बंगालमध्ये ईव्हीएम जाळण्यात आले. ९७% मुस्लिम मते असलेल्या गावात भाजपला ९०% मते मिळाल्याचा प्रश्न उपस्थित झाल्याने ४,००० ईव्हीएम जाळण्यात आले, असा आरोपही त्यांनी केला.
बुधवारी (१० जून) दक्षिण कोलकाताच्या अलीपूर भागातील नऊ मजली इमारतीला भीषण आग लागली. या इमारतीत इतर विभागांसोबतच दक्षिण २४ परगणा जिल्हा परिषदेचे कार्यालय होते. अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा राज्यमंत्री कौशिक चौधरी यांनी सांगितले की, आगीत अंदाजे ४,००० ईव्हीएम नष्ट झाले. या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत १० मतदारसंघांमध्ये या ईव्हीएमचा वापर करण्यात आला होता.
इम्रान मसूद यांनीही नीट पेपरफुटीवर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, जे काही घडत आहे ते दर्शवते की देश हुकूमशाहीकडे वाटचाल करत आहे. देशातील सर्व यंत्रणा ठप्प करण्याची तयारी केली जात आहे, असे ते म्हणाले.



























































