
वणी शहरातील सतराव्या शतकातील ऐतिहासिक बारव झाडाझुडपांच्या आणि कचऱ्याच्या विळख्यात अडकून पडली असताना ती स्वच्छ करण्यासाठी अखेर इतिहासप्रेमी युवकांना पुढाकार घ्यावा लागला. विद्यार्थ्यांच्या श्रमदानातून हा ऐतिहासिक ठेवा पुन्हा प्रकाशझोतात आला असला, तरी या निमित्ताने पुरातत्त्व विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
गोंड राजवटीतील स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना असलेली ही बारव अनेक वर्षांपासून दुर्लक्षित होती. सभोवताली वाढलेली झाडेझुडपे, विहिरीत साचलेला कचरा आणि देखभालीचा पूर्ण अभाव यामुळे हा ऐतिहासिक वारसा अक्षरशः नामशेष होण्याच्या मार्गावर होता. मात्र संबंधित यंत्रणांना याची साधी दखलही घ्यावीशी वाटली नाही.
इतिहासप्रेमी अमित उपाध्ये यांनी ही बाब लक्षात आणून दिल्यानंतर युवकांनी स्वतः पुढाकार घेत श्रमदान मोहीम राबविली. झाडाझुडपे हटवून, कचरा बाहेर काढून त्यांनी बारव पुन्हा खुली केली. या मोहिमेत अमित उपाध्ये, अनिकेत बदखल, संदीप गोहोकार, सागर जाधव, अक्षय कवरासे, कपिल राऊत, वैभव मेहता आणि वैभव वाघमारे यांनी सहभाग घेतला.
विशेष म्हणजे, ऐतिहासिक वास्तूंचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी स्वतंत्र पुरातत्त्व विभाग अस्तित्वात असताना ही बारव वर्षानुवर्षे दुर्लक्षित कशी राहिली, असा प्रश्न आता नागरिक उपस्थित करीत आहेत. ऐतिहासिक ठेव्यांचे जतन करण्याची जबाबदारी युवकांनी घ्यायची आणि विभागाने केवळ कागदोपत्री कामे करायची का, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे.
बारव वाचवली विद्यार्थ्यांनी; मग पुरातत्त्व विभाग नेमके करतो काय?
वणी, शिरपूर आणि पळसोनी परिसरातील गोंडकालीन बारवा हा जिल्ह्याचा अमूल्य ऐतिहासिक वारसा आहे. मात्र त्यांचे संवर्धन आणि संरक्षणाबाबत कोणतीही ठोस कृती दिसून येत नाही. विद्यार्थ्यांनी केलेले श्रमदान कौतुकास्पद असले तरी ही वेळ येणेच पुरातत्त्व विभागाच्या उदासीनतेचे द्योतक असल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.
आता तरी संबंधित विभागाने जागे होऊन या ऐतिहासिक वारशाच्या संवर्धनासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.



























































