
जूनचा अर्धा महिना संपला तरी सर्वत्र मान्सूनचा अभाव पाहता जोरदार पावसाची प्रतीक्षा आणि पाणीटंचाईचे संकट जाणवू लागले आहे. जिह्यात राधानगरी, वारणा, काळम्मावाडी या प्रमुख धरणांसह इतर अशा एकूण 93.77 टीएमसी क्षमतेच्या एकूण 17 लहान-मोठ्या धरण प्रकल्पात सध्या केवळ 24.38 टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. या पाणीपातळीत तब्बल चारपट घट झाली आहे.जिह्यात आतापर्यंत केवळ 12 टक्केच पावसाची नोंद झाली असून, ऐन जून महिन्यात पावसाऐवजी उन्हाचेच चटके बसत आहेत.
‘अल निनो’च्या प्रभावामुळे पाऊस लांबला असून, महिना अखेरीस पावसास सुरुवात होईल, असा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त केला जात आहे. तूर्त पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळीवर एक दिवस पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. शेतातील पेरणीही खोळंबली आहे. शिवाय नद्या, नाले, तलाव आणि धरणातील पाण्याने तळ गाठला असून, पाच दिवसांत पंचगंगेच्या पाणीपातळीत चार फुटांची घट झाली आहे. सकाळी पंचगंगेची राजाराम बंधारा येथे पाणीपातळी सहा फूट होती.
धरणांच्या पाणलोट क्षेत्रात 15 दिवसांत एकूण सरासरी 43 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिह्यात जून महिन्यात पडणाऱया सरासरी पावसाच्या तुलनेत यावर्षी आजअखेर केवळ 44 मि.मी. इतकाच पाऊस झाला आहे. हे प्रमाण केवळ 12 टक्केच आहे. जून महिन्यात पाऊस सरासरी गाठण्याची शक्यता धुसर असल्याने चिंतेचे ढग निर्माण झाले आहे. तसेच खरीपाच्या पेरण्या करण्यासाठी शेतकऱयांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत.
जिह्यातील धरणसाठ्यांतील सध्याची पाणीपातळी टक्केवारीत
राधानगरी 26 टक्के, वारणा 42, तुळशी 33, दूधगंगा 9, कासारी 22, कडवी 30, कुंभी 32, पाटगाव 27, चिकोत्रा 34, चित्री 27, जंगमहट्टी 33, घटप्रभा 46, जांबरे 31, आंबेओहोळ 60, सर्फनाला 52, धामणी 29 आणि कोदे लपा 12 टक्के.
10 प्रमुख नद्यांवर उपसाबंदी लागू
भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, यावर्षी ‘अल-निनो’ परिस्थितीचा प्रभाव राहण्याची शक्यता असल्याने पर्जन्यमानात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिह्यातील धरणांमधील उपलब्ध पाणीसाठा पिण्यासाठी वापरण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. त्यानुसार जिह्यातील पंचगंगा, भोगावती, दूधगंगा, वारणा, तुळशी, कासारी, कडवी, कुंभी, धामणी आणि जांभळी याप्रमुख नद्यांच्या दोन्ही तीरांवरील शेतीसाठी पाणी उपसा करण्यास बंदी केली आहे, अशी माहिती कोल्हापूर पाटबंधारे विभाग (उत्तर), कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी दिली.



























































