
>> प्रभाकर पवार
मे महिन्याच्या अखेरीस दक्षिण मुंबईच्या आग्रीपाडा परिसरातील यास्मिन टॉवर या उच्चभ्रू सोसायटीमधील एका फ्लॅटमध्ये उपायुक्त नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली कांदिवली युनिटच्या अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत जगदाळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी धाड घालून एमडी (मेफेड्रॉन) निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त केला. एका बांगलादेशी महिलेसह तिघांना अटक केली. अमली पदार्थ तयार करण्यासाठी लागणारे रसायन व इतर यंत्रसामग्री असा एकूण ५० कोटी रुपयांचा मुद्देमाल तेथे पोलिसांना आढळून आला. अत्यंत खतरनाक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शोएब मन्सुरी या आरोपीने एक महिन्यापूर्वीच महिना ५० हजार रुपये भाडेतत्त्वावर यास्मिन टॉवरमध्ये फ्लॅट घेतला होता. मालकाला संशय येऊ नये म्हणून शोएबने फोरास रोडवरून एका बांगलादेशी वेश्येला फ्लॅटमध्ये आणून बसविले होते. शोएब याचा मूळ व्यवसाय महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या पळविणे हा होता. चेन स्नॅचिंगचे त्याच्यावर २५ गुन्हे दाखल आहेत, परंतु इग्स निर्मितीमध्ये अमाप पैसा आहे. प्रचंड मागणी आहे, असे लक्षात आल्यावर शोएबने भाड्याने घर घेऊन त्यात एमडी ड्रग्ज बनविण्यास सुरुवात केलीः परंतु केवळ १५ दिवसांतच शोएबच्या या प्रयोगशाळेची भनक मुंबई क्राईम ब्रँचच्या कांदिवली युनिटच्या अमली पदार्थ विरोधी पथकास मिळाली आणि अल्पावधीत श्रीमंत होण्याचे शोएबचे स्वप्न भंगले.
कांदिवलीच्या अॅण्टि नारकोटिक्सच्या या धडक कारवाईनंतर उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली साकीनाका पोलिसांनी अंधेरी-घाटकोपर लिंक रोडवर मुस्कान खान या महिलेला व त्यानंतर मुंब्रा येथून वझूल चौधरी ऊर्फ पप्पू अशा दोघांना ड्रगच्या साठ्यासह अटक केली असता वझूलने गुजरात येथील आपल्या घरामध्ये ड्रग्स निर्मितीचा कारखाना असल्याचे पोलिसांना सांगितले.
अलीकडे शाळा-कॉलेजमधील मुले तसेच नोकरी-धंदा नसलेले बहुसंख्य तरुण नैराश्यामुळे व्यसनांकडे झुकत आहेत. याचाच फायदा गुन्हेगारी प्रवृत्तीने घेतला आहे. दाट लोकवस्ती, चाळींमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्स निर्मितीचे छोटे कारखाने आढळून येत आहेत. पालघर, नायगाव, वसई विरारपासून कल्याण-बदलापूर ते नवी मुंबई आदी ठिकाणच्या भागांतील घरांत ड्रग्सची निर्मिती करून त्याची विक्री केली जात आहे. सातारा, सांगली, पुणे व नाशिक ही ठिकाणंही अपवाद नाहीत. या भागातच नाशिकच्या ललित पाटीलचे ड्रग्सचे कारखाने आढळून आले. या ड्रग्स विक्रीच्या धंद्यात अमाप नफा असल्याचे लक्षात आल्यावर आता मोठ्या प्रमाणात दाऊदच्या हस्तकांनी या व्यवसायात हातपाय पसरले आहेत. मुंबईतील ड्रग्स माफिया इक्बाल मिर्ची बॉम्बस्फोटांनंतर लंडनला स्थायिक झाला. आता तो हयात नाहीः परंतु त्याची मीरा-भाईंदरमधील फारुख बटाटा व शहाजाद बटाटा ही पिलावळ अमली पदार्थांच्या तस्करीत सक्रिय आहे. एकेकाळची सिने अभिनेत्री ममता कुलकर्णीचा जोडीदार तसेच आंतरराष्ट्रीय ड्रग्स माफिया विकी गोस्वामीला ठाणे पोलीस शोधत आहेतः परंतु गुजरातच्या अहमदाबादचा विकी सध्या अमेरिकेच्या ताब्यात आहे, असे सांगितले जाते.
दाऊदचा डोंगरीचा हस्तक सालीम डोला याने अमली पदार्थांचा पुरवठा करून दुबईत आपले मोठे साम्राज्य उभे केले आहे. २०१२ साली त्याला अटक होऊन ५ वर्षे सजाही झाली होती. परंतु जामिनावर सुटून बाहेर आल्यानंतर सालीमने दाऊदच्या ड्रग्स सिंडिकेटमध्ये भाग घेतला. यूएई, सौदी अरब आदी देशांच्या खोट्या पासपोर्टवर तुर्कीच्या इस्तंबूलमध्ये त्याने आश्रय घेतला आणि तो पुन्हा ड्रग्सचा पुरवठा करू लागला. जामिनावर सुटलेला हा खतरनाक गुंड वॉण्टेड आहे, भारताला हवा आहे. त्याची माहिती देणाऱ्यास एक लाखाचे बक्षीस दिले जाईल असे भारताच्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने जाहीर केले. रेड कॉर्नर नोटीसही प्रसिद्ध केली. या सर्व पार्श्वभूमीवर २५ एप्रिल २०२६ रोजी सालीम डोला तुर्कीच्या इस्तंबूलमध्ये तुर्की सुरक्षा एजन्सीच्या हाती लागला. अटकेनंतर विमानाने त्याला दिल्लीत पाठविण्यात आले. मुंबई क्राईम बॅचच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता सालीमने पोलिसांना खळबळजनक माहिती दिली आहे.
चर्चगेटपासून पालघर व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून बदलापूरपर्यंत १० ते १५ हजार रुपयांपर्यंत सहजपणे भाड्याची घरे मिळतात. त्या स्वस्त घरांमध्ये जीवघेणी सिंथेटिक ड्रग्स बनविली जातात. त्यामुळे बहुसंख्य भाड्याची घरे सिंथेटिक ड्रग्सच्या नशेचे केंद्र बनत आहेत.. छोटा शकीलचा भाऊ अन्वर हा सालीम डोलाच्या संपर्कात अलीकडे होता. आता सालीम जेलमध्ये गेल्याने छोटा शकील आणखी कुणीतरी सालीम डोला तयार करून आपले नेटवर्क सुरू ठेवील. ‘ड्रग्स’चा व्यवसाय ही दाऊद टोळीची अर्थवाहिनी आहे, दाऊद आपल्या जन्मापासून या धंद्यात आहे. दाऊद भारतातील कुठल्या गैरधंद्यात नाही असा गैरधंदा शोधावा लागेल. सोन्या-चांदीची तस्करी करणाऱ्या दाऊदसारख्या स्मगलरची पाळेमुळे मुंबईत घट्ट रुजली आहेत. मुंबई क्राईम बॅचचे प्रमुख अनिल कुंभारे व त्यांचे सहकारी ती उखडून टाकतील अशी अपेक्षा करण्यात येत आहे. गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त म्हणून सूत्रे हाती घेतल्यावर अनिल कुंभारे यांनी सायबर व ड्रग्स माफियांचे समूळ उच्चाटन करणे ही आमची “प्रायॉरिटी” असणार आहे अशी ग्वाही दिली आहे, त्यांना आमच्या शुभेच्छा!


























































