
>> दिलीप ठाकूर
कोणत्याही वयोगटातील, इतकेच नव्हे तर कोणत्याही सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्तीची आत्महत्या हा कायमच गूढ आणि गुंतागुंतीचा विषय. त्यातही मनोरंजन क्षेत्रातील कलाकाराची आत्महत्या ही कायमच अनेक प्रश्न, शंका निर्माण करते. हे क्षेत्र बाहेरून जेवढे चकाचक, सुखासीन, ऐषआरामी वाटते तितके ते सर्वांच्याच बाबतीत नसते. अशातच एका कामानंतर दुसरं काम मिळण्यास अवाजवी उशीर होणे हे मानसिक भावनिक चढ-उताराचे असते. त्यातून वेळीच सावरता आले नाही तर मनात भलतासलता विचार येऊ लागतो. संचिता उगले हिने तरुण वयात आत्महत्या केल्याने पुन्हा एकदा अशाच अनेक गोष्टींवर चर्चा सुरू झाली. संचिता उगलेने आत्महत्येच्या काही तास अगोदर ‘सरगम’ या चित्रपटातील ‘डफलीवाले डफली बजा’ या सर्वकालीन सुपरहिट गाण्याचा मनसोक्त मनमुराद आनंद घेत असल्याची चित्रफीत समाज माध्यमातून पोस्ट केली आणि त्यात तरी ती खूप आनंदी दिसतेय, मात्र त्यानंतर काहीच काळानंतर तिने आपल्या आयुष्याचा प्रवास संपवावा हे जास्तच धक्कादायक.
अशा वेळी अनेक निष्कर्ष काढले जातात, समाज माध्यमातून अर्थात फेसबुक, इन्स्टाग्रामवर लाखो सबस्क्राईबर आणि व्ह्यूअर्स असले तरी प्रत्यक्ष आयुष्यात कोणीही मित्र नसतो. त्यातूनच एकाकीपण येते, तर कधी अपेक्षित संधी मिळत नाही, फसगत होते आणि मानसिक तोल ढळतो वगैरे वगैरे. संचिता उगलेला लहानपणापासून अभिनयाची आवड. मुंबई उपनगराबाहेर नालासोपारा येथे राहून मनोरंजन क्षेत्रात ये-जा करणे, तिने स्वीकारले आणि त्यात काही उल्लेखनीय कामगिरी केली. त्यात लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ या चित्रपटातील ताराबाई ही व्यक्तिरेखा विशेष उल्लेखनीय. ‘कुमकुम भाग्य’ या मालिकेतील दीपा टंडन या भूमिकेने संचिता उगले घराघरांत पोहोचली. ‘दिलवाली दुल्हनियाँ ले जायेगी’ या दैनंदिन मालिकेतील सुकून ही तिची भूमिकाही लक्षवेधक ठरली.
‘सायलेन्सर’ या चित्रपटांतून, ‘साजन घर’ या मालिकेत तिने भूमिका साकारली. प्रत्यक्ष आयुष्यात संचिता उगले ही अतिशय मनमोकळ्या, दिलखुलास स्वभावाची आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून असे. अलीकडेच तिने एका मुलाखतीत बोलताना सांगितले होते की, मालिकांमध्ये काम करत असताना दिवसातील 18/19 तास आपण घरापासून दूर राहतो. त्यात आपले खासगी आयुष्य राहत नाही. आपल्याला मनोरंजन क्षेत्र या क्षेत्राबाहेरील व्यक्ती असे मानते अशीही एक खंत तिने बोलून दाखवली होती. कदाचित त्याच व्यक्तिगत आयुष्यातील एखाद्या निराशाजनक गोष्टीने ती खचली नसावी ना?





























































