
महाराष्ट्र कॉँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष हटाव मोहीम तीव्र झाली आहे. प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत काही नाराज नेत्यांनी सपकाळ यांची थेट दिल्लीत तक्रार करत पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाकडे दाद मागितली आहे.
संघटनात्मक बांधणीसाठी काँग्रेसकडून संघटन सृजन अभियान राबविण्यात आले. या अभियानांतर्गत संपूर्ण राज्यात नवीन शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. मात्र, या निवडी करताना स्थानिक नेत्यांना विश्वासात घेतले गेले नाही, असा आरोप नाराज गटाकडून केला जात आहे.
भेटीची प्रतीक्षा
सपकाळ यांच्याविरोधात काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करणाऱ्यांमध्ये माजी राज्यमंत्री अनिल पटेल, बुलढाण्यातील संजय राठोड, परभणीचे माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील, माजी आमदार नामदेव पवार यांचा समावेश आहे. खरगेंच्या भेटीनंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या भेटीची संबंधितांनी वेळ मागितली आहे.
तक्रार काय?
पक्ष संघटना कमकुवत झाली असून कार्यकर्त्यांमध्ये असंतोष वाढला आहे. विधानसभा निवडणुकीनंतर पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही आणि संघटनात्मक पातळीवर पक्षाची एकजूट ढासळल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे राज्यात काँग्रेसला नव्या नेतृत्वाची गरज असल्याचा दावा या गटाकडून करण्यात येत आहे.



























































