
नीट- यूजी 2026 फेरपरीक्षेला अवघे काही दिवस शिल्लक असताना नॅशनल टेस्टिंग एजन्सीने सोशल मीडियावरील पेपरफुटीच्या अफवा, बनावट वेबसाईट आणि तोतया अधिकाऱ्यांना आळा घालण्यासाठी एक खास तक्रार पोर्टल सुरू केले आहे. 21 जून रोजी होणाऱ्या फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये, असे आवाहन सरकारच्या वतीने करण्यात आले आहे. विद्यार्थी आता innovateindia.mygov.in/neet-ug-2026 या अधिकृत पोर्टलवर जाऊन तक्रारी नोंदवू शकतात.
कोणत्या तक्रारी करता येतील…
पेपर किंवा ‘आन्सर की’चा दावा करणाऱ्या बनावट पोस्ट आणि वेबसाईट.
पैशांच्या बदल्यात ‘लीक झालेला पेपर’ किंवा ‘नक्की निकालाची’ हमी देणाऱ्या टोळ्या किंवा व्यक्ती.
‘एनटीए’चे अधिकारी किंवा परीक्षा केंद्र प्रमुख असल्याचा बनावट आव आणणारे तोतया लोक.
परीक्षेशी संबंधित कोणतीही संशयास्पद किंवा बेकायदेशीर हालचाल.
अधिकृत माहितीसाठी केवळ nta.ac.in आणि neet.nta.ac.in या संकेतस्थळांचाच वापर करावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे.


























































