
>> संजय ग्रोव्हर
संपत्तीची निर्मिती ही काही शंभर, दोनशे मीटर वेगवान धावण्याची शर्यत नाही. ती तर एक मॅरेथॉन अर्थात दीर्घ पल्ल्याची शर्यत आहे. बाजारपेठ नेहमी संयमालाच फळ देते. ज्या गोष्टी तुमच्या नियंत्रणात आहेत, केवळ त्याच गोष्टींवर लक्ष केंद्रित करा. जसे की, वेळ, सातत्य आणि स्वतःच्या भावनांवरील नियंत्रण. बाकीचे सर्व बाजारावर सोडून द्या.
तुमच्या गुंतवणुकीला म्हणजेच पोर्टफोलिओला तुम्ही वेळ देत असाल तर हीच गुंतवणुकीसाठीची तुमची सर्वोत्तम निवड आहे. कारण शेअर्सच्या घसघशीत कामगिरीचा लाभ पदरात पाडून घेण्यासाठी त्यांच्यात दीर्घकालीन कालावधीसाठी गुंतवणूक कायम ठेवणे अतिशय आवश्यक असते.
गुंतवणूकदार अनेकदा बाजारात प्रवेश करण्यासाठी योग्य क्षणाची किंवा अचूक वेळेची वाट पाहत अनेक वर्षे घालवतात. एवढेच नव्हे तर बाजारात थोडी जरी घसरण झाली तर घाबरून जातात. तरीही वित्तीय बाजारपेठेतील दोन दशकांपेक्षा (20 वर्षांपेक्षा) जास्त काळाच्या अनुभवातून मला एकच बाब प्रामुख्याने नजरेसमोर येते आणि ती म्हणजे बाजारपेठेत अचूक वेळ साधण्यापेक्षा बाजारपेठेत जास्तीत जास्त वेळ टिकून राहणे. हाच संपत्ती निर्मितीचा खरा पाया आहे.
शेअर बाजार कधी वर जाईल किंवा कधी खाली येईल, याचा अंदाज लावणे हे मुंबईच्या पावसाची सुरुवात कोणत्या तारखेला होईल, याचा अंदाज लावण्यासारखे आहे आणि ते पूर्णपणे अवघड आहे. अगदी अनुभवी तज्ञांनाही बाजारातील अल्पकालीन हालचालींचा अचूक अंदाज वर्तविणे अतिशय कठीण जाते. कारण शेअर बाजारावर युद्ध किंवा आंतरराष्ट्रीय वाद यासारखे भू-राजकीय बदल, सरकारकडून जाहीर झालेली आर्थिक आकडेवारी, आर्थिक संकट आणि अगदी एखादे व्हायरल झालेले ट्विट किंवा टिपणी यांसारख्या गोष्टींचाही तत्काळ प्रभाव पडत असतो.
या गोष्टीचा विचार करा
2005 पासूनच्या ‘निफ्टी 50’च्या चढउतारांच्या केलेल्या अभ्यासात आम्ही निर्देशांकात 10 टक्क्यांपेक्षा अधिक घसरणीच्या विविध प्रसंगांचा अभ्यास केला. पूर्वी घडलेल्या अशा 15 प्रसंगांपैकी तेरावेळा या निर्देशांकाने घसरणीच्या एक वर्षानंतर सकारात्मक परतावा दिलेला आहे. नकारात्मक परतावा मिळाल्याचे केवळ दोनच प्रसंग या कालावधीत घडले होते. 10 टक्के घसरणीनंतर निर्देशांकाने एका वर्षात सरासरी 18 टक्के इतका जबरदस्त परतावा दिला.
शेअर बाजारात सतत सुरू असणारे चढउतार पाहता या चढ-उतारांच्या काळात घट्ट पाय रोवून उभे राहणे गरजेचे आहे. म्हणजेच गुंतवणुकीबाबत संयम राखणे आवश्यक आहे. कोणताही वर्तणूक मानसशास्त्रज्ञ तुम्हाला हेच सांगेल की, भावनेच्या भरात या सल्ल्याचे पालन करणे अत्यंत कठीण असते, परंतु काही वेळा बाजार खाली जात असताना तत्काळ प्रतिसाद देण्याचा मोह आवरणे आणि संयम व दृढनिश्चयाने आपली गुंतवणूक सुरूच ठेवणे याच गोष्टी तुमच्या संपत्ती निर्मितीच्या प्रवासाचे नेमके यश निश्चित करत असतात. जेव्हा शेअर बाजारात घबराट पसरते तेव्हा तुमचे पैसे बुडत नाहीत. तुमचे पैसे तेव्हाच बुडतात, जेव्हा तुम्ही स्वतः घाबरून जाता.
आपण 2005 ते 2025 मधील आकडेवारीच्या आधारे हा मुद्दा समजून घेऊ या. या कालावधीत आपण वेगवेगळ्या वर्षांमधील असे 15 दिवस निवडले जेव्हा बाजार 10 टक्के घसरला होता. या प्रत्येक तारखेपासून बरोबर एक वर्षानंतर बाजाराने किती परतावा दिला, याचा अभ्यास केला असता या 15 तारखांपैकी अकरावेळा शेअरबाजाराने जोरदार मुसंडी मारत दुहेरी अंकात परतावा दिला. अगदी अलीकडचे उदाहरण घ्यायचे झाले तर 4 मार्च 2025 रोजी बाजार 10 टक्के घसरला होता, परंतु त्या दिवसापासून अवघ्या एक वर्षानंतर म्हणजे 4 मार्च 2026 पर्यंत बाजाराने 11 टक्के परतावा दिला आहे.
शेअर बाजारात होणाऱ्या चढ-उतारातून मला अलीकडेच एका कार्यक्रमात घडलेला प्रसंग वारंवार नजरेसमोर येतो. या कार्यक्रमात अतिशय रंजक प्रसंग घडला. पहिल्या रांगेत एक गृहस्थ बसलेले होते आणि ते सतत मागच्या बाजूला सुरू असलेल्या नाश्ता वाटपाकडे पाहत होते. तो नाश्ता त्यांच्यापर्यंत पोहोचेपर्यंत त्यांच्या प्लेटमध्ये काहीच उरले नव्हते. पुढच्या वेळी आपली संधी हुकू नये या निर्धाराने कोल्ड्रिंक्सचे वाटप सुरू होताच ते लगबगीने मागच्या रांगेत जाऊन बसले, परंतु तिथे गेल्यावर त्यांना कळले की, कोल्ड्रिंक्सचे वाटप पुढच्या रांगेतून सुरू करण्यात आले आहे. तरीही त्यांनी आशा सोडली नाही. एक महिला हातात एक वाटी घेऊन येताना त्यांना दिसताच त्या गृहस्थाने आशेने आपला हात पुढे केला, परंतु त्या महिलेने वाटीतून त्यांच्या हातावर फक्त एक ‘टूथपिक’ टेकवली.
या कथेचा बोधप्रद म्हणजे शेअर बाजारात सतत एका शेअरमधून दुसऱ्या शेअरमध्ये किंवा एका फंडातून दुसऱ्या फंडात उड्या मारण्याचा आणि अचूक वेळ साधण्याचा (टायमिंग द मार्केट) प्रयत्न करू नका. जर तुम्ही शिस्तबद्ध आणि संयमी असाल तर तुम्हाला चांगला परतावा नक्कीच मिळेल. अचूक वेळेच्या आशेने सतत आपली गुंतवणूक किंवा रणनीती बदलत राहिल्याने अनेकदा तुमचे जास्त नुकसान होते. कारण शेवटी संयम आणि शिस्तीचेच फळ मिळते.
तुमच्या पोर्टफोलिओला म्हणजेच तुम्ही केलेल्या गुंतवणुकीला बाजारात वेळ देणे ही कृती तुम्ही नक्कीच करू शकता आणि हीच कृती सर्वोत्तम गुंतवणूक निवडींपैकी एक निवड होय. कारण शेअर्समध्ये खरोखरच चांगली कामगिरी होण्यासाठी दीर्घकालीन गुंतवणूक टिकवून ठेवण्याची आवश्यकता असते. जून 1999 मध्ये ‘निफ्टी 50 टोटल रिटर्न इंडेक्स’ या निर्देशांकाचा श्रीगणेशा झाला. तेव्हापासून 26 वर्षांच्या कालावधीत या निर्देशांकाने दिलेला ‘रोलिंग रिटर्न्स’ म्हणजेच विविध कालखंडात दिलेल्या परताव्याचा अभ्यास असे दर्शवितो की, जर तुमचा गुंतवणुकीचा कालावधी किमान सात वर्षांचा असेल तर (या 26 वर्षांत) एकही प्रसंग असा नव्हता, जिथे नकारात्मक (तोटा) परतावा मिळालेला आहे. इतकेच नव्हे, तर 20 एप्रिल 2026 पर्यंतच्या संशोधन आकडेवारीचा विचार केला तर या सात वर्षांच्या कालावधीत सरासरी रोलिंग परतावा 15 टक्के इतका जबरदस्त मिळालेला आहे.
संपत्तीची निर्मिती ही काही शंभर, दोनशे मीटर वेगवान धावण्याची शर्यत नाही. ती तर एक मॅरेथॉन अर्थात दीर्घ पल्ल्याची शर्यत आहे. बाजारपेठ नेहमी संयमालाच फळ देते. ज्या गोष्टी तुमच्या नियंत्रणात आहेत, केवळ त्याच गोष्टींवर लक्ष केंद्रित करा. जसे की, वेळ, सातत्य आणि स्वतःच्या भावनांवरील नियंत्रण. बाकीचे सर्व बाजारावर सोडून द्या.
(लेखक बडोदा बीएनपी परिबा ऍसेट मॅनेजमेंट इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे एमडी आणि सीईओ आहेत.)



























































