मेस्सीच्या अखेरच्या वर्ल्ड कप मोहिमेची सुरुवात, गतविजेत्या अर्जेंटिनासमोर अल्जेरियाचे आव्हान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगज्जेतेपदाचे संरक्षण करण्यासाठी सज्ज झालेल्या अर्जेंटिना संघाची फुटबॉल वर्ल्ड कपची मोहिम बुधवारी अल्जेरियाविरुद्धच्या सामन्याने सुरू होणार आहे. ‘जे’ गटात अर्जेंटिनासह अल्जेरिया, ऑस्ट्रिया आणि जॉर्डन या संघांचा समावेश असून, या गटात अर्जेंटिनाला प्रबळ दावेदार मानले जात आहे.

या स्पर्धेकडे संपूर्ण फुटबॉल विश्वाचे लक्ष लागले आहे. कारण महान फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीचा हा अखेरचा वर्ल्ड कप असण्याची शक्यता आहे. कतार 2022 मध्ये जिंकलेले विजेतेपद राखून मेस्सीने कारकीर्दीचा शेवट करावा, अशी चाहत्यांची अपेक्षा आहे. बुधवारी मेसी अर्जेंटिनासाठी 200वा आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. तसेच सहा विश्वचषकात खेळणारा पहिला अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू बनण्याचा मानही त्याला मिळणार आहे.

लिओनेल स्कालोनी यांच्या मार्गदर्शनाखाली अर्जेंटिनाने सलग सात सामने जिंकत शानदार फॉर्म कायम ठेवला आहे. या कालावधीत त्यांनी 21 गोल झळकवले असून, केवळ एकच गोल स्वीकारला आहे. त्यामुळे सलामीच्या सामन्यात विजय मिळवून मोहिमेची सुरुवात करण्याचा त्यांचा निर्धार आहे.

अर्जेंटिनाचे पारडे जड

दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत केवळ एकच सामना झाला असून 2007 मध्ये अर्जेंटिनाने 4-3 अशी रोमांचक विजयाची नोंद केली होती. सध्याचा फॉर्म, अनुभव आणि संघाची ताकद पाहता अर्जेंटिनाचे पारडे स्पष्टपणे जड मानले जात आहे. अल्जेरियाची बचावफळी मजबूत असली तरी मेस्सी, लाऊटारो मार्टिनेझ आणि मॅकऑलिस्टर यांच्या आक्रमणासमोर त्यांची खरी कसोटी लागणार आहे. विश्वविजेत्या अर्जेंटिनाला सलामीच्या सामन्यात विजयाची अपेक्षा असली तरी अल्जेरिया धक्का देण्यास सक्षम आहे. त्यामुळे हा सामना रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.

उद्याच्या लढती

फ्रान्स विरुद्ध सेनेगल – वेळ ः रात्री 12ः30 वाजता (बुधवार)
इराक विरुद्ध नॉर्वे – वेळ ः पहाटे 3ः30 वाजता (बुधवार)
अर्जेंटिना विरुद्ध अल्जेरिया – वेळ ः सकाळी 6ः30 वाजता (बुधवार)
ऑस्ट्रेलिया विरुद्ध जॉर्डन – वेळ ः सकाळी 9ः30 वाजता (बुधवार)