
>> संध्या शहापुरे
सर्वोत्तम परमेश्वराच्या दासाच्या मनात, चांगल्या वाईट कसल्याच गोष्टींची अपेक्षा नसते. केवळ आपल्या दैवताबद्दलचे प्रेम आणि भक्तीची तहान असते. देव त्या भक्ताच्या भक्तीचाच ऋणी राहतो. असा सर्वोत्तम परमेश्वराचा दास जगात धन्यता पावतो. माणसाच्या मनातली आशा कधीच तृप्त होत नाही. मला हे, ते सर्व मिळाले पाहिजे या भावनेतून पराकोटीचा स्वार्थ निर्माण होतो. आशेची पूर्तता झाली नाही की क्रोध येतो. लालसा, कामना वाढत जाते. आशेपोटी माणूस जीवनाशी झगडत राहतो, त्यातूनच निराशा दुष्ट आशा, दुराशा निर्माण होतात. आणि शेवटी दुःखच वाटय़ाला येते.
संसारिक सुखाची तहान- पिपासा कधी भागतच नाही. समर्थ रामदास करुणाष्टकात म्हणतात की, ‘सुख सुख म्हणता हे दुःख ठाकून आले। भजन सकळ गेले चित्त दुश्चित्त झाले। नको द्रव्यदारा नको येरझारा। नको मानसी ज्ञान गर्वे फुगार।। समर्थ रामदास प्रत्यया वाचून बोलत नाहीत. आधी केले मग सांगितले असे त्यांच्या शिकवणीचे अंतसूत्र आहे. त्यांनी जनतेच्या उद्धारासाठी शेकडो मठ स्थापून संघटना केली. शिष्य संपदा निर्माण केली. या सर्व व्यापा-तापात असूनही ते नसल्यासारखे होते. अलिप्त होते, असे दिसते. त्यांचा आत्मवृत्त पर उद्गार फार महत्त्वाचा आहे, ‘दास डोंगरी राहतो, यात्रा देवाची पाहतो, देव भक्तासवे जातो, तो ध्यान रूपे।।’
नको अंतरी नष्ट आशा दुराशा।
वसे मानसी प्रेम पाशा पिपाशा।
ऋणी देव हा भक्ति भावे जयाचा।
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा।।



























































