आदिवासी जेन झींचा आज शिवाजी पार्कवर आक्रोश मोर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्यासह आदिवासी विभागाचे आयुक्त  व सचिवांच्या  राजीनाम्याच्या प्रमुख मागणीसाठी उद्या, रविवारी सकाळी 11 वाजता आदिवासी जेन झींचा शिवाजी पार्कवर जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांनी आझाद मैदान किंवा शिवाजी पार्कमध्ये आंदोलनासाठी परवानगी मागितली होती, पण पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. तरीही मोर्चा होणारच. आंदोलनाला परवानगी नाकारून सरकार व पोलीस आमचा आवाज दाबू शकणार नाही, असा इशारा आदिवासी विद्यार्थ्यांनी दिला आहे. आदिवासी विद्यार्थी मागील दोन महिन्यांपासून आंदोलन करीत आहेत.

विद्यार्थ्यांनी नाशिकला 42 दिवस धरणे आंदोलन केले, तेरा दिवस उपोषण केले तरीही विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नव्हत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांनी 28 सप्टेंबरला नाशिक ते मुंबई लाँग मार्च काढला. 4 ऑक्टोबरला मुंबईत पोहोचले. जेन झीचा आक्रोश मोर्चा काढण्यासाठी परवानगी मागितली. पोलीस प्रशासनाने आझाद मैदानात परवानगी नाकारली. त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

विद्यार्थी प्रतिनिधींच्या म्हणण्यानुसार आमचे आदिवासी विद्यार्थी आम्ही शिक्षण व न्यायासाठी आंदोलन करीत आहोत, पण हे सरकार व पोलीस प्रशासन आम्हाला परवानगी देत नाही. राज्यातल्या आदिवासी शाळांमध्ये सध्या बिकट अवस्था आहे. विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधाही मिळत नाहीत. आम्ही आमचा अधिकार मागत आहोत, पण हे सरकार आम्हाला दुर्लक्षित करीत आहे. मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही या सरकारला 25 ऑक्टोबरपर्यंत अल्टिमेटम दिला होता. उद्या रविवारी शिवाजी पार्कमध्ये आदिवासी जेन झी आक्रोश मार्चा काढणार आहेत. आमच्या आंदोलनाचा आवाज दाबण्याचा कितीही प्रयत्न केला तरी खपवून घेणार नाही. तुम्ही आमचा आवाज दाबू शकत नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला.

विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या

  • आदिवासी शाळांच्या परिस्थितीमध्ये सुधारणा करा.
  • सेंट्रल किचनचे कंत्राट त्वरित रद्द करा.
  • आदिवासी विकास मंत्र्यांसह आयुक्त व सचिवांचा तत्काळ राजीनामा घ्या.