
मध्य रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत झालेली असतानाच भांडुप रेल्वे स्थानकात एक भीषण दुर्घटना घडली आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वरून रेल्वे रूळ ओलांडताना एका तरुणाला एसी लोकलची जोरदार धडक बसली. या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला आहे. धडकेनंतर तरुण जवळपास 15 ते 20 मिनिटे फरफटत गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मुंबईहून ठाणेमार्गे कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या एसी लोकलची ही धडक असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस आणि रेल्वे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी पुढील कारवाई सुरू असून, मृत तरुणाची ओळख पटवण्यासाठी आणि त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहेत.
दरम्यान, मध्य रेल्वेच्या लोकल सेवेला सोमवारी तांत्रिक बिघाडाचा मोठा फटका बसला. सकाळी 9 वाजून 23 मिनिटांनी मुलुंड आणि ठाणे स्थानकांदरम्यान डाउन स्लो मार्गावरील ओव्हरहेड इक्विपमेंट (ओएचई) वायर तुटली. याशिवाय कांजूरमार्ग स्थानकात तसेच विक्रोळी आणि भांडुपदरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याची माहिती आहे. या तांत्रिक समस्यांमुळे मध्य रेल्वेच्या लोकल गाड्या 15 ते 60 मिनिटे उशिराने धावत होत्या. त्यामुळे कामावर जाणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल झाले. काही प्रवाशांना रेल्वे रुळांवरून चालत पुढील स्थानक गाठण्याची वेळ आली.
ओव्हरहेड वायरमधील बिघाड दूर करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास वीजपुरवठा खंडित करून तुटलेल्या तारा हटवण्याचे काम सुरू केले. मात्र, त्यानंतरही रेल्वे वाहतुकीवर परिणाम कायम असल्याची माहिती समोर आली. एकीकडे लोकल सेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांची गैरसोय झाली असताना दुसरीकडे भांडुप स्थानकातील तरुणाच्या मृत्यूच्या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.





























































