“दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या हातावर 5 हजारांच्या टिकल्या टेकून थट्टा; पण कुंभमेळ्याच्या नावाखाली…”, रोहित पवार यांचा हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या खर्चावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या हातावर 5 हजारांच्या टिकल्या टेकून त्यांची थट्टा केली जात आहे, तर दुसऱ्या बाजूला नाशिक कुंभमेळ्याच्या नावाखाली केल्या जाणाऱ्या 35 हजार कोटींच्या खर्चाचा कोणताही हिशोब द्यायला तयार नाही, असा आरोर रोहित पवार यांनी केला आहे. याबाबत त्यांनी वृत्तपत्रामध्ये नोटीस प्रसिद्ध करून थेट कायदेशीर लढाईचे रणशिंग फुंकले आहे.

रोहित पवार यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून शनिवारी सकाळी एक पोस्ट शेअर केली. यात ते म्हणाले की, अन्नदाता शेतकरी भीषण दुष्काळाच्या आगीत होरपळत असताना, हे सरकार त्याच्या हातावर ५ हजार रुपये टिकल्या टेकून त्याची थट्टा करणार आणि दुसऱ्या बाजूला नाशिक कुंभमेळ्याच्या नावाखाली केल्या जाणाऱ्या ३५,००० कोटी रुपये खर्चाचा कोणताही हिशोब द्यायला तयार नाही!

कुंभमेळ्याच्या निधीतून होणाऱ्या कामांमध्ये प्रचंड अनियमितता, निकृष्ट दर्जा आणि भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप होतायेत. यातील काही माहिती आमच्याकडं असून सरकारकडूनही ही माहिती मिळतेय का हे पाहण्यासाठी एक लोकप्रतिनिधी म्हणून मी विविध शासकीय विभागांकडे पत्रव्यवहार केला, माहिती अधिकारात (RTI) अधिकृत अर्ज दिले; परंतु जाणीवपूर्वक ही माहिती दडवली जातेय, असा आरोप रोहित पवार यांनी केला.

जनतेच्या घामाच्या पैशावर डल्ला मारणारे हे महाभाग कोण आणि त्यांना कोण पाठीशी घालतंय? सरकार माहिती का लपवतंय, हे आम्हाला पहायचंय… पण माहिती दिली नाही म्हणून आम्ही थांबणार नाही. त्यासाठी आज थेट वृत्तपत्रात ‘जाहीर नोटीस’ प्रसिद्ध करून कायदेशीर लढाईचं रणशिंग फुंकलं. सर्व कायदेशीर हत्यारांचा वापर करून आम्ही ही लपवलेली माहिती बाहेर काढू. पवित्र कुंभमेळ्याच्या नावाखाली नक्की कुणाचे खिसे भरले गेले, याचा काळाबाजार जनतेच्या न्यायालयात आणल्याशिवाय हा लढा थांबणार नाही, असेही रोहित पवार यांनी म्हटले.

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी वाशीममध्ये शिवसैनिकांनी अकोला महामार्ग रोखला; पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट, आमदार नितीन देशमुख यांना अटक