मंथन – ‘गोकुळ’चा कंडका!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> विठ्ठल जाधव

कोल्हापूरच्या मातीत राजकारणाची गणिते सत्तेच्या आकडय़ांपेक्षाही स्थानिक अस्मिता, सहकाराची मुळे आणि जनतेशी असलेल्या नात्यावरही ठरतात, हे गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीने दाखवून दिले. राज्यातील सत्ताधारी दिग्गज नेत्यांची फौज एका बाजूला आणि आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी दुसऱ्या बाजूला. या प्रतिष्ठेच्या लढतीत समविचारी आघाडीने 25 पैकी 13 जागा जिंकत सत्ताधाऱ्यांना धोबीपछाड मारली. आमदार सतेज पाटील यांनी ‘कंडका’ पाडला आणि ‘गोकुळ’च्या सत्तेवर कब्जा केला.

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ म्हणजेच ‘गोकुळ’ दूध संघाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत भाजप, अजित पवार गट, शिंदे गट, खासदार धनंजय महाडिक, विनय कोरे यांची जनसुराज्य आघाडी, असे सत्ताधारी महायुतीतील नेत्यांचे पाठबळ, मंत्र्यांची ताकद, आमदार-खासदारांची प्रतिष्ठा आणि सहकार क्षेत्रातील प्रभाव या सगळ्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. दुसरीकडे सतेज पाटील यांनी स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे जुळवत समविचारी आघाडीची मोट बांधली. खासदार शाहू महाराज, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि महाविकास आघाडीच्या स्थानिक सहकार क्षेत्रातील नेत्यांची साथ त्यांना मिळाली.

‘क्रॉस व्होटिंग’!

महायुतीच्या प्रचंड राजकीय ताकदीसमोर सतेज पाटील यांची आघाडी संख्याबळाने कमी पडेल या धुंदीत महायुतीचे नेते राहिले. कोल्हापूरचा दूध उत्पादक शेतकरी हुशार. त्याने निकालाने हे गणित उलटे केले. पॅनेल टू पॅनेल मतदान होईल, या अपेक्षेला छेद देत झालेल्या क्रॉस व्होटिंगने निकाल पलटवला. मंत्री हसन मुश्रीफ यांचे पुत्र नविद मुश्रीफ, माजी अध्यक्ष विश्वास पाटील, अरुण डोंगळे आणि शौमिका महाडिक यांच्यासारख्या प्रमुख चेहऱ्यांना पराभवाचा सामना करावा लागला. दुबार मतमोजणी आणि बाद मतांचे राजकारण महायुतीच्या नेत्यांनी केले. निवडणूक अधिकाऱ्यांवर दबाव आणला. यामध्ये सतेज पाटील यांच्या चार-पाच जागा गेल्या. मात्र तरीही त्यांनी सत्ता ताब्यात घेतलीच. त्यांच्या भाषेत बोलायचे तर कंडका पाडला!

गोकुळच्या निकालातील सर्वाधिक चर्चेचा मुद्दा म्हणजे सतेज पाटील यांनी उभारलेली राजकीय व्यूहरचना. समोर राज्यातील सत्ताधारी पक्षांची एकत्रित ताकद असताना स्थानिक पातळीवर विविध घटकांना एका मंचावर आणणे, निवडणुकीचा केंद्रबिंदू ठरवणे आणि मतदारांपर्यंत तो मुद्दा पोहोचवणे, हे त्यांच्या नेतृत्वासमोरील मोठे आव्हान होते. त्यांनी या निवडणुकीत गोकुळवरील स्थानिक नियंत्रण, दूध उत्पादकांचे हित आणि सहकारी संस्थेच्या स्वायत्ततेचा मुद्दा पुढे आणला. राज्यातील सत्ताधारी पक्षांशी दोन हात करत स्थानिक पातळीवर विजय मिळवता येतो, असा संदेश या निकालातून मिळाल्याने महाविकास आघाडीला उभारी मिळू शकते.

‘अमूल’चा बोका 

महाराष्ट्रात गुजरातमधील ‘अमूल’चा शिरकाव काही वर्षांपूर्वी झाला. पुणे, अहिल्यानगर, सोलापूर, नाशिक या जिल्ह्यांमध्ये अमूलने घट्ट पाय रोवले आहेत. परिणामी तेथील जिल्हा आणि तालुका सहकारी दूध संघ एकप्रकारे वांझोटे झाले आहेत. गोकुळसारखा दुधाळ आणि तोहीदेखील म्हशीच्या दुधात राज्यात नंबर एक असलेला संघ कुठल्या ना कुठल्या माध्यमातून काबीज करणे हा धूर्त हेतू भाजप नेत्यांचा होता. सरदार वल्लभभाई पटेल मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह फेडरेशनच्या माध्यमातून अमूलचा बोका ‘गोकुळ’कडे गुर्रगुर्र करून पाहत होता. नेमका हाच मुद्दा सतेज पाटील यांनी हेरला. निवडणुकीच्या प्रचारात तो लोकांच्या मनावर बिंबवला. तो यशस्वी झाला. मतदारांनी ‘अमूल’चा बोका बाहेर फेकला!

अमूल ही गुजरातची, परंतु देशातील मोठी आणि आर्थिकदृष्टय़ा सक्षम सहकारी दुग्धसंस्था. तिचा विस्तार आणि दूध व्यवसायातील ताकद निर्विवाद आहे. महाराष्ट्राबरोबर तामीळनाडू, कर्नाटकमध्ये  त्यांनी व्यवसाय वाढवला आहे. मात्र म्हशीच्या दुधामध्ये गोकुळचे वर्चस्व आहे. मुंबईची दुधाची संपूर्ण बाजारपेठ गोकुळच्या हातात आहे. दूध व्यवसायामध्ये जवळपास 70 टक्क्यांपर्यंत खासगीकरणाचे वारे शिरले असताना गोकुळसारखा सहकारी संघ आजही टिकून आहे.

गोकुळची ताकद

गोकुळ हा फक्त दूध संकलन आणि पी करणारा संघ असला तरी तो कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आधार आहे. गोकुळची वार्षिक उलाढाल सुमारे 4,185 कोटी रुपये आहे. संघाचे दररोजचे सरासरी दूध संकलन 16.24 लाख लिटर, तर दूध उत्पादकांची संख्या सुमारे 4.91 लाख आहे. गावपातळीवरील 8,461 दूध संस्थांचे जाळे. दर 10 दिवसांना 100 ते 120 कोटी रुपयांचे पगार वाटप. गोकुळची ही खरी ताकद आहे. दूध उत्पादक शेतकरी, गावपातळीवरील दूध संस्था, वाहतूक, प्रािढया, वितरण आणि रोजगार अशा अनेक घटकांचे आर्थिक हित या संघाशी जोडलेले आहे. संघाची हजारो दूध संस्थांपर्यंत पोहोचलेली यंत्रणा आणि मोठी उलाढाल यामुळे त्याचे महत्त्व सहकाराच्या चौकटीपलीकडे जाते. राजकारणालाही त्यातून रसद मिळते.

गोकुळच्या निकालामुळे महाविकास आघाडीतील घटक पक्षांना राजकीय उभारी मिळणार हे निश्चित आहे. राज्यातील अनेक राजकीय घडामोडींमध्ये सत्ताधारी महायुतीचे वर्चस्व दिसत असताना कोल्हापूरच्या सहकार क्षेत्रात त्यांना गुलाल उधळायला मिळाला नाही. गोकुळचा निकाल वेगळा आहे. सहकारातील असली तरी ही निवडणूक सर्वसाधारण निवडणुकीसारखी झाली. कोल्हापूरबरोबर पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणावरदेखील त्याचे परिणाम भविष्यात दिसू शकतील. किंबहुना भाजपच्या आणि अजित पवार गटाच्या पश्चिम महाराष्ट्रातील नेतृत्वाच्या मर्यादा यामुळे अधिक स्पष्ट झाल्या आहेत.

ह भाजपचे ज्येष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गोकुळमध्ये विरोधकांना 0-25 करू अशी वल्गना केली. हा दावा सतेज पाटील यांनी रोखला. नाविद मुश्रीफ, शौमिका महाडिक यांच्यासह तीन माजी अध्यक्षांचा निवडणुकीत पराभव झाला. गोकुळसाठी महायुतीची घोषणा असली तरी वर एकीचा देखावा होता. मात्र आतून कुरघोडय़ांनी महायुती पोखरली गेली. सतेज पाटलांनी याचा आदमास घेऊन ’डाव’ टाकले. महाविकास आघाडीची एकजूट भक्कम केली आणि फड जिंकला. निकालातही सत्तेचा त्रास झाला. बाद मतांचे राजकारण झाले. मात्र त्यातही महायुतीला मार खावा लागला.