
>> अरूण
चिनी लोकांचं नेहमी काहीतरी वेगळंच चाललेल असतं. बांबूच्या पडद्याआड स्वत:ला दडवून, जगाला आपल्या उलाढालींचा पत्ता न लागता, हवी तेवढीच माहिती काचेबाहेरच्या जगात प्रसृत करणारा चीन हे पूर्वापार एक कोडंच आहे. परंतु त्यांच्या हडेलहप्पी राजवटीने विज्ञान-तंत्रज्ञानातल्या अनेक क्षेत्रात झेप घेतली आहे. प्रत्येक क्षेत्रात त्यांचे काहीतरी आगळे-वेगळे प्रयोग सुरू असतात.
आता काय तर म्हणे, झिंझियंगमधल्या (वायव्य चीन) टाक्लिमाकनच्या वाळवंटात चहूकडे रेताड जमीन असताना मधेच गहू पिकवण्याचा यशस्वी उद्योग चिनी लोकांनी केलाय. तेसुद्धा गव्हाच्या शेतांचे मोठमोठे गोल करून! प्रश्न पडेल की शेती अशी वर्तुळाकार का? उत्तर म्हटलं तर सोपं आहे, पण जगाला सुचलं नव्हतं. वाळंवट आहे याचाच अर्थ पाण्याचा कायमचा तुडवडा. नळांद्वारे बाहेरचं पाणी तिथे नेता येईलच आणि त्यावर पिकंही घेता येतील हे उघड आहे. परंतु पारंपरिक शेतीमध्ये शेत जिथे नि जसं आहे तशी पाणीपुरवठय़ाची व्यवस्था करावी लागते. कुठे ठिबक तर कुठे शिंपण (प्रिंकल) पद्धतीने कमी पाण्यात पिकं तगवता येतात. परंतु प्रिंकल्स लावण्यावर भौगोलिक मर्यादा येते. दोन प्रिंकल्सचं पाणी एकमेकांना भेदू शकतं (ओव्हरलॅप). मग पाण्याच्या थेंब न् थेंबाचा वापर करायचा असेल तर शेताची रचना तशी हवी.
वाळवंटात मुळात शेती शून्य. तिथे ती नव्याने ’वसवायची’ तर तंत्रस्नेही असावे या विचारातून गव्हाची गोलाकार लागवड करण्यात आली आणि पाणी देण्याच्या पद्धतीला ’सेंटर पायव्होट इरिगेशन’ किंवा मध्यानुवर्ती जलसिंचन म्हटलं गेलं. याचा अर्थ असा की, एकाच मध्यबिंदूपासून काही सिंचन नलिका विशिष्ट गोलात (पंख्याच्या पात्यांसारख्या) गरागरा फिरणार आणि त्यातून उडणारं पाणी जमिनीत झिरपून (इथे वाळूत) पिकं फोफावणार. यासाठी त्यानी 380 मीटरचे ’लाँग प्रे आर्म’ बनवले. म्हणजे एवढय़ा त्रिज्येच्या वर्तुळातील प्रत्येक रोपाला पाणी मिळणार हे नि:संशय.
त्यासाठी त्यानी कुनलुन पर्वतातून पाणी आणलं. ते स्वच्छ केलं आणि वाळवंटात कमी पाण्यावर गहू, ओटस्, अल्फाल्फा अशी पिकं घ्यायला सुरुवात केली. यातलं अल्फाल्फा औषधी म्हणूनही प्रसिद्ध आहे. या शेतीसाठी थेट उपग्रहाची मदत घेऊन काम नीट चाललंय ना यावर लक्ष ठेवलं जातं.
’प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे’ हे मध्यपूर्वेत पेट्रोलने खरं ठरवलं. तसं ’प्रयत्ने वाळूचे कण भिजविता पिकही डुले’ हे चीनने सिद्ध केलंय!






























































