
शिवसेनेचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्याकांडातील मुख्य सूत्रधारांना अटक न केल्याच्या निषेधार्थ पूर्णेकर कुटुंबीयांसह संतप्त ठाणेकरांनी घोडबंदर रोडवर मंगळवारी रात्री उशिरा जोरदार आंदोलन केले. त्यामुळे ठिकठिकाणची वाहतूक ठप्प झाली. त्याची झळ मुंबई-अहमदाबाद मार्गालाही बसली. या मार्गावर पहाटेपासून वाहनांच्या २० किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागल्या होत्या. वर्सोवा ब्रिजपासून विरारपर्यंत फुल टू ट्रॅफिक जाम झाले.
प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येनंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने ठाणेकर रस्त्यावर उतरले असून त्याची झळ दूरवर पोहोचली. रात्रीपासूनच अनेक वाहनचालक वाहतूककोंडीत अडकले होते. मुंबई-अहमदाबाद मार्गावर कार, बाईक, ट्रक तसेच अवजड वाहने यांचा जांगडगुत्ता झाला. कामण-चिंचोटी मार्गदेखील या कोंडीमध्ये सापडला होता. चिंचोटी उड्डाणपुलाजवळ बापाणे परिसरात अपघाताच्या घटना घडल्यामुळे या कोंडीमध्ये आणखीनच भर पडली.
या वाहतूककोंडीमुळे सकाळी कामावर जाणारे नोकरदार, कामगार आणि विद्यार्थ्यांना चांगलीच कसरत करावी लागली. सध्या शाळांच्या परीक्षा सुरू असल्याने विद्यार्थ्यांना वेळेत केंद्रावर पोहोचताना अडचणींचा सामना करावा लागला.
ठाण्यातील आंदोलन तसेच २० किलोमीटरपर्यंतच्या लागलेल्या वाहनांच्या रांगा लक्षात घेता नागरिकांनी अंदाज घेऊनच मुंबई-अहमदाबाद मार्गावरून प्रवास करावा, असेही आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले होते.
आज सकाळपासूनच कामण ते चिंचोटी पूल, चिंचोटी ते बापाणे आणि चिंचोटी ते सातिवली पुलापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसून आले.



























































