
महापालिका रुग्णालयांमधील रक्त केंद्र ‘सार्वजनिक-खासगी भागीदारी’ (पीपीपी) तत्त्वावर देण्याचा प्रशासनाचा डाव आहे. मात्र या रक्त पेढ्या खासगी संस्थांना चालवायला दिल्या तर महागाईने कंबरडे मोडलेल्या सर्वसामान्य रुग्णांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. प्रशासनाच्या या निर्णयाचा तीव्र निषेध करत शिवसेनेने महापालिका रुग्णालयांवर धडक देत रक्त केंद्रांचे खासगीकरण होऊ देणार नाही, असा इशारा दिला. प्रशासनाने निर्णय थांबवला नाही तर तीव्र आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला.
शिवसेना शिव आरोग्य सेनेचे कार्याध्यक्ष डॉ. किशोर ठाणेकर व उपाध्यक्ष डॉ. जयवंत गाडे यांच्या उपस्थितीत शिवसैनिकांनी राजावाडी, केईएम आणि नायर रुग्णालयावर धडक दिली. रक्त केंद्र खासगीकरणाचा निर्णय थांबवून विस्कळित झालेली आरोग्य सेवा तत्काळ पूर्ववत करण्यात यावी, अशी तंबी यावेळी शिवसैनिकांनी दिली. यावेळी मुंबई जिल्हा संपर्क समन्वयक अमोल वंजारे, सहसमन्वयक प्रकाश वाणी, सचिव ज्योती भोसले, शिव आरोग्य सेना ठाणे जिल्हा संपर्क समन्वयक डॉ. प्रशांत भुईंबर, ओवळा माजिवडा विधानसभा समन्वयक अझीम शेख, डॉ. विश्वनाथ गायकवाड, शिवडी विधानसभा अनंत कोटकर, फार्मसी सेलचे स्वप्नील शिनकर, भायखळा विधानसभा राजाराम झगडे, अक्षया चव्हाण, गुलाब ठाकूर, सुशांत भुईंबर, पैलास गोसावी, आकेश कदम, जयेश पवार, कीर्ती भाटकर आदी उपस्थित होते.


























































