
>> मंगेश वरवडेकर
अमेरिकेचा एक मोठा गुण आहे. ते प्रत्येक गोष्टीत व्यवसाय शोधतात. ती त्यांची ताकद आहे. आपण चहात साखर टाकतो. ते त्यात स्पॉन्सर शोधतात. आपण फुटबॉलचा सामना पाहतो. अमेरिकन त्यात जाहिरातींसाठी मोकळी जागा शोधतात.
फिफा वर्ल्ड कपचा उद्घाटनीय सामना पाहत होतो आणि तेव्हा अचानक 22व्या मिनिटाला रेफ्रीची शिट्टी वाजली आणि क्षणभर वाटलं, कुणी फाऊल केलं असावं. पण नाही. कुणी कुणाला लाथ मारलेली नसते. रेड कार्ड नसतो. वार नसतो. फक्त खेळाडूंना तहान लागलेली असते. मग सर्व खेळाडू बाटल्या घेऊन उभे राहतात, सुटाबुटातली कोच मंडळी कानात सूचना फुंकतात आणि टीव्हीवर जाहिरातींचा धबधबा सुरू होतो. हे दृश्य आता प्रत्येक सामन्याला पाहायला मिळतंय. या 3 मिनिटांच्या ब्रेकला ‘हायड्रेशन ब्रेक’ असे नाव देण्यात आलेय.
आता उकाडय़ात खेळणाऱ्या खेळाडूंना पाणी मिळायला हवं याबद्दल वाद नाही. मेक्सिको, कॅनडा आणि अमेरिकेच्या काही शहरांमध्ये उन्हाचा पारा खेळाडूंच्या सहनशक्तीची परीक्षा घेतो. पण गंमत तिथे सुरू होते, जिथे स्टेडियमच एखाद्या पंचतारांकित हॉटेलसारखं वातानुकूलित आहे. तिथेही तीच शिट्टी. तिथेही तीच बाटली.
हा ब्रेक काहींना दिलासा देतोय, तर काहींना खटकू लागलाय. स्पेनचे प्रशिक्षक लुईस दे ला फुएंते म्हणतात, ब्रेक चांगला आहे. खेळाडूंना श्वास घ्यायला वेळ मिळतो. दुसरीकडे अमेरिकेच्या कोचची विरुद्ध प्रतिक्रिया आहे. ते म्हणतात, प्रचंड उकाडा असेल तर ठीक, पण वातावरण चांगलं असेल तर हा ब्रेक नको. कारण फुटबॉल हा लयीत खेळला जाणारा खेळ आहे. आता प्रायोजकांचे दोन शब्द ऐकूया, असे म्हणालात तर सूर बिघडणारच ना.
उद्घाटनीय सामन्यात हा ब्रेक फारसा जाणवला नाही, पण डलास स्टेडियमवरही तोच प्रकार घडला. मला क्षणभर वाटलं, हा फुटबॉल सामना आहे की ‘योगशिबीर’? एसीच्या गारव्यात खेळणाऱ्या खेळाडूंना श्वास घेण्यासाठी तीन मिनिटांचा सरकारी कोटा लागतोय हे ऐकून मुंबई लोकलमधला प्रवासीही हसेल, इतका तो ब्रेक खटकला. पण हा ब्रेक अमेरिकन ब्रॉडकास्टर्सची चांदी करणारा होता. गेल्या प्रत्येक सामन्यात ब्रेकदरम्यान जाहिरातींचा वेळ वाढल्याच्या चर्चा रंगू लागल्यात.
माजी इंग्लिश स्टार इयान राइटने तर यावर सरळ बोटच ठेवलं. त्याच्या मते हा खेळाडूंच्या आरोग्यापेक्षा अमेरिकन जाहिरात संस्कृतीचा विजय आहे. यात तथ्य आहे. कारण या ब्रेकने तहान भागते की सामना बदलतो? या ब्रेकला चक्क मोमेंटम ब्रेक असेही नाव पडलेय. ब्राझील मोरोक्कोविरुद्ध पिछाडीवर होता. ब्रेक झाला. कार्लो अँचेलोटीने डाव बदलला. काही मिनिटांत विनिसियस ज्युनियरने गोल ठोकला. सामना वेगळ्याच दिशेला गेला. कॅनडा पिछाडीवर. ब्रेक झाला. काही क्षणांत गोल. स्कॉटलंडने ब्रेकनंतर लगेच निर्णायक गोल केला. ऑस्ट्रेलियानेही तसंच केलं. म्हणजे हा पाणीब्रेक नसून प्रशिक्षकांसाठी टाइमआउटच झाला. पण नाण्याची दुसरी बाजूही आहे. काही सामन्यात ब्रेकनंतर सामन्याचा रंगही उडालाय.
नेदरलॅण्ड्स आघाडीवर होते. ब्रेकनंतर ती आघाडी वाफेसारखी उडून गेली. एक खेळाडू म्हणून हा ब्रेक अनेकांच्या पचनीच पडलेला नाही. त्याचं कारण सोपं आहे. तुम्ही हरत असाल तर तुम्हाला लगेच हल्ला करायचा असतो. तुम्ही जिंकत असाल तर प्रतिस्पर्ध्याचा श्वास कोंडायचा असतो. फुटबॉल हा भावनांचा, वेगाचा आणि लयीचा खेळ आहे. मधेच त्याचा प्लग काढून टाकला की जादू उडून जाते.
या ब्रेकने अनेक मजेशीर प्रश्न निर्माण केलेत. जर हा ब्रेक फक्त आरोग्यासाठी आहे, तर कोचना रणनीती सांगण्याची मुभा कशाला? जर हा फक्त पाण्याचा ब्रेक आहे, तर तो टाइमआउटसारखा का वापरला जातो? जर हा खेळाडूंच्या भल्यासाठी आहे, तर ब्रॉडकास्टर्स त्यात जाहिराती का कोंबत आहेत? या प्रश्नांची उत्तरं फिफाच्या तिजोरीत असतील.
उकाडय़ात खेळाडूंना पाणी द्या. दोनदा द्या. दहा वेळा द्या. कुणाचाच विरोध नाही. पण वातानुकूलित स्टेडियममध्ये, सुखद तापमानात, 22व्या मिनिटाला घडय़ाळ लावून सामना थांबवणं म्हणजे जणू एखाद्या थरारक सिनेमात क्लायमॅक्सच्या आधी जाहिराती घुसवण्यासारखं आहे. फुटबॉलचा आत्मा सतत वाहणाऱ्या नदीसारखा असतो. हा ‘हायड्रेशन ब्रेक’ त्या नदीवर बांधलेले छोटेसे धरण वाटतेय. बाकी वर्ल्ड कप अजून लांब आहे. पुढे काय होतं ते दिसेल. पण सध्या तरी प्रेक्षकांच्या मनात एकच प्रश्न घोळतोय, खेळाडूंची तहान भागवण्यासाठी हा ब्रेक आहे, की ब्रॉडकास्टरच्या खिशाची तहान भागवण्यासाठी? कारण अनेक सामन्यांत असं वाटलं की…पाणी पिता पिता गेमच गेला!

























































