प्रत्येक भूमिका माणसाला डोळस बनवते! दिलीप प्रभावळकर, स्वाती चिटणीस नाट्य परिषदेच्या ‘जीवनगौरव’ने सन्मानित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रत्येक भूमिका काहीतरी देऊन जाते, तसेच प्रत्येक पुरस्कारही काहीतरी देऊन जातो. भूमिका माणसाला डोळस वा शहाणी बनवते, तर पुरस्कार विनम्र बनवतो, अशी भावना ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी व्यक्त केली.

अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला नाटककार गो. ब. देवल स्मृतिदिन पुरस्कार वितरण सोहळा आणि कलावंत मेळावा यशवंतराव चव्हाण नाटय़ संकुल, माटुंगा येथे आज पार पडला. या सोहळ्यात दिलीप प्रभावळकर आणि ज्येष्ठ नाटय़-सिने अभिनेत्री स्वाती चिटणीस यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार आणि आमदार महेश सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आले.

रंगभूमी पहिले प्रेम – प्रभावळकर

मी बऱयाच माध्यमातून काम केले. पण माझे पहिले प्रेम, आस्था म्हणजे रंगभूमी. रंगभूमीच्या सगळ्या माध्यमांमध्ये मुशाफिरी करता आली याची आनंद आहे. माझ्या वाटचालीत सहकलाकारांचाही वाटा आहे. त्या सगळ्यांसोबत मी हा पुरस्कार स्वीकारतोय, अशा भावना दिलीप प्रभावळकर यांनी व्यक्त केल्या.

यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, नाटय़ परिषदेचे विश्वस्त शशी प्रभू, 101 व्या नाटय़संमेलनाचे अध्यक्ष मोहन जोशी, अशोक हांडे, डॉ. गिरीश गांधी, विजय केंकरे, चंद्रकांत कुलकर्णी, विजय गोखले अजित भुरे आदी उपस्थित होते.

रंगभूमीने आयुष्य समृद्ध – चिटणीस

रंगभूमी माझी गुरू आहे, माझी मैत्रीण आहे. या रंगमंचाने मला सुखाची उभारी दिली, अनेक आयुष्य जगण्याची संधी देऊन समृद्ध केले, अशी कृतज्ञता स्वाती चिटणीस यांनी व्यक्त केली.