ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा झालाच पाहिजे, सीजेपी मागणीवर ठाम, सर्वांशी चर्चा करून ठरवणार आंदोलनाची रणनिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावाच लागेल, असे स्पष्ट करत यासंदर्भातील आंदोलनाची रणनिती सर्वांसोबत चर्चा केल्यानंतर ठरविण्यात येईल, अशी माहिती कॉक्रोच जनता पार्टीचे (सीजेपी) नेते आशुतोष रांका यांनी आज दिली.

सीजेपीचे नेते सौरभ दास आणि आशुतोष रांका यांनी आज विशेष कार्यकारी दंडाधिकारी न्यायालयासमोर हजेरी लावली. त्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना रांका यांनी सांगितले की, ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आम्ही ठाम आहोत. त्यांना राजीनामा द्यावाच लागेल. यासंदर्भातील आंदोलनाचा निर्णय सर्वांशी चर्चा केल्यानंतर घेण्यात येईल. हे आंदोलन केवळ सीजेपीपुरते मर्यादित नाही. अनेक संघटना तसेच व्यक्ती आंदोलनाशी जोडल्या आहेत. सर्वांशी चर्चा करून आंदोलनाची रणनिती ठरवू, असे रांका म्हणाले.

न्यायालयीन प्रक्रियेचा आदर करा – सौरभ दास

सौरभ दास म्हणाले की, ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा दिलाच पाहिजे. मात्र, याप्रकरणी भाष्य करताना न्यायालयीन प्रक्रियेच्या मर्यादा पाळायला हव्या. न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना त्यासंदर्भातील माहिती प्रसारमाध्यमांमध्ये उघड केली जात आहे. अशा पद्धतीने माहिती प्रसारित करणाऱयांनी मर्यादा ओलांडल्यास कायदेशीर कारवाईचा विचार करू, असा इशाराही दास यांनी दिला.