
राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केलेल्या 304 तालुक्यांमध्ये तब्बल 141.53 लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून या नुकसानीपोटी केंद्राकडे 15 हजार 386 कोटी रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. राज्य सरकारने दुष्काळी मदतीसाठी एकूण 31 हजार कोटी रुपयांचा एकत्रित प्रस्ताव गेल्या आठवडय़ात केंद्राला दिला आहे. या प्रस्तावात पीक नुकसानीपोटी सर्वात जास्त मदत मागण्यात आली आहे.
पेंद्रीय गृह मंत्रालयाने नैसर्गिक आपत्तीतील नुकसानीच्या मदतीच्या दरात वाढ केल्याने राज्य सरकारला आता सुधारित प्रस्ताव पाठवावा लागणार आहे. त्यामुळे केवळ पीक नुकसानीपोटीच्या मदतीत 5 ते 6 हजार कोटी रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. राज्याच्या मदतीच्या प्रस्तावात 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या क्षेत्राचा समावेश आहे.
बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी स्वतंत्र मदतीची मागणी करण्यात आली आहे. या पिकांसाठी प्रति हेक्टर 22 हजार 500 रुपये दरानुसार 1 हजार 561 कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. नव्या दरांनुसार या मदतीत सुमारे 500 कोटी रुपयांची वाढ अपेक्षित आहे. त्यामुळे पीक नुकसानीपोटी केंद्राकडे पाठविण्यात येणाऱया एकूण मदतीच्या प्रस्तावात आणखी पाच ते सहा हजार कोटी रुपयांची भर पडणार आहे.
दुष्काळग्रस्त भागातील बाधित पीक क्षेत्र
जिरायती 106.54 लाख हेक्टर
बागायती 28.05 लाख हेक्टर
बहुवार्षिक 6.94 लाख हेक्टर
महाराष्ट्र सरकारने खरीप हंगामातील प्रर्जन्यांची तुट लक्षात घेऊन राज्यातील 358 पैकी 304 तालुक्यांमध्ये अंतिमता दुष्काळ जाहीर केला आहे.
जिरायतीसाठी 9 हजार कोटींची मागणी
दुष्काळग्रस्त क्षेत्राच्या वर्गीकरणात जिरायती पिकांचे क्षेत्र सर्वाधिक आहे. या क्षेत्रासाठी 9 हजार 56 कोटी 37 लाख रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. केंद्र सरकारने मदतीचे दर वाढविल्याने जिरायती शेतीच्या मदतीत 3 हजार 196 कोटी रुपयांची वाढ होणार आहे. त्यामुळे या क्षेत्रासाठीचा सुधारित प्रस्ताव 12 हजार 252 कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. बागायती पिकांसाठी प्रति हेक्टर 17 हजार रुपये मदतीचा दर गृहित धरून 4 हजार 768.62 कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावात आणखी 1 हजार 403 कोटींची वाढ होणार आहे.























































