
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा आणि मतदार याद्यांच्या एसआयआर प्रक्रियेला रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीत आज जोरदार निदर्शने करण्यात आली. डाव्या संघटना तसेच ‘पीपल अगेन्स्ट एसआयआर’च्या नेतृत्वाखाली या मागण्यांसाठी निवडणूक आयोगाच्या मुख्यालयावर मोठा मोर्चा काढण्यात आला. त्यात शेकडो जणांनी सहभाग घेतला. दिल्ली पोलिसांनी शंभरहून अधिक निदर्शकांना अटक केली.
ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा आणि एसआयआर रद्द करणे, या प्रमुख मागण्या निदर्शकांनी केल्या. मोर्चामध्ये माकपच्या नेत्या वृंदा करात, सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र यादव यांच्यासह अनेक डाव्या संघटनांनीही सहभाग घेतला. मोर्चादरम्यान ‘ज्ञानेश कुमार राजीनामा द्या, एसआयआर रद्द करा, ज्ञानेश कुमार यांना अटक करा,’ अशा घोषणा देण्यात आल्या. दिल्लीसह बंगळुरू, कोलकाता, गुवाहाटी इत्यादी ठिकाणीदेखील निदर्शने करण्यात आली.
सरकारला आंदोलनाची धास्ती, दिल्लीत बंदोबस्तात वाढ
ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा तसेच एसआयआर रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीत निदर्शने करण्यात आली. या आंदोलनांची मोदी सरकारने धास्ती घेतली असून दिल्लीत केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांच्या 273 कंपन्यांची तैनाती 31 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांच्या मागणीनंतर दिल्लीत 301 कंपन्यांच्या तैनातीला मंजुरी देण्यात आलेली आहे.






















































