
मुंबईतील वाढते प्रदूषण रोखण्यात पालिका प्रशासन सफशेल अपयशी ठरल्याचा आरोप करीत आज शिवसेनेसह सर्वच विरोधक, सत्ताधाऱयांसह महापौरांनी प्रशासनाच्या कामावर तीव्र नाराजी व्यक्त केली. वाढत्या प्रदूषणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने आणि पालिका प्रदूषणाबाबतच्या धोरणांची अंमलबजावणी करीत नसल्याने मुंबईत प्रदूषणात वाढ होत असल्याचे नगरसेवक म्हणाले. प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने कडक उपाययोजना करावी, अशी मागणीही नगरसेवकांनी यावेळी केली.
मुंबईतील वाढत्या प्रदूषणाबाबत पालिकेतील विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी निवेदन करून चर्चा घडवून आणली. मुंबईतील हवेचा दर्जा आज इतका घसरला आहे की, मुंबईकर श्वास घेत नसून रोज विष पित आहेत. मुंबईचा सरासरी एक्यूआय (AQI) 150 ते 200 च्या पुढे गेला आहे. पंचतारांकित भागातील हवेची गुणवत्ता दिल्लीपेक्षाही वाईट झाली आहे, असा आरोप करीत किशोरी पेडणेकर यांनी पालिका प्रशासनाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. श्रद्धा जाधव, सचिन पडवळ यांनीदेखील प्रदूषणाबाबत प्रशासनाला धारेवर धरले. काँग्रेसचे गटनेते अशरफ आजमी यांनी, मुंबईतील प्रदूषणात वाढ होत असून पालिकेने प्रदूषण रोखण्यासाठी काय उपाययोजना केली? कोणती दंडात्मक कारवाई केली? असे प्रश्न उपस्थित करीत जाब विचारला. मनसेचे गटनेते यशवंत किल्लेदार यांनी, मुंबईतील प्रदूषण वाढल्याने नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम झाला असल्याचे सांगत प्रदूषणाला कारणीभूत असलेल्या इमारत बांधकामावर कारवाई करण्याची आणि ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली, तर कितीही मोठा बिल्डर असला तरी प्रदूषण करीत असेल तर कारवाई करा, असे सभागृह नेते गणेश खणकर म्हणाले.
आरएमसी प्लांट मुंबईतून बाहेर फेका
मुंबईत बांधकामाच्या ठिकाणचे आरएमसी प्लांट प्रदूषणात भर घालत आहेत. त्यामुळे आरएमसी प्लांट मुंबईबाहेर फेका, अशी सूचना महापौर रितू तावडे यांनी केली. यावर हे प्लांट बाहेर गेल्यास घराच्या किमतीत वाढ होईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे यांनी सभागृहात दिली. काही वेळा हवामानातील बदलामुळे प्रदूषण वाढते, तर काही वेळा प्रदूषणाबाबत चुकीची माहिती पसरवली जात असल्याचेही ढाकणे यांनी स्पष्ट केले.


























































