
फ्रान्सची राजधानी पॅरिसच्या पश्चिमेकडील ट्रॅप्स परिसरात झालेल्या गोळीबारात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून, किमान चार जण जखमी झाले आहेत. भरधाव वाहनातून गोळीबार करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी एका संशयिताला अटक करण्यात आली असून, फ्रान्सच्या राष्ट्रीय दहशतवादविरोधी सरकारी वकील कार्यालयाने तपास सुरू केला आहे. मात्र, या हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
फ्रान्समधील यवेलिन्स जिल्ह्यातील ट्रॅप्स परिसरात ही घटना घडली. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, एका चालत्या वाहनातून गोळीबार करण्यात आला. या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर अन्य चार जण जखमी झाले आहेत. फ्रान्सचे पंतप्रधान सेबॅस्टियन लेकोर्नू यांनीही मृत्यू आणि जखमींच्या संख्येला दुजोरा दिला आहे.
फ्रान्सच्या राष्ट्रीय दहशतवादविरोधी सरकारी वकील कार्यालयाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन दहशतवादविरोधी यंत्रणाही तपास करत आहेत. गोळीबारामागे वैयक्तिक वाद, गुन्हेगारी संघर्ष किंवा दहशतवादी कट यांपैकी नेमके कोणते कारण आहे, याचा शोध घेतला जात आहे.
फ्रान्समधील बीएफएम या वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, या प्रकरणात एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. मात्र, संशयिताची ओळख, गोळीबारातील त्याची कथित भूमिका आणि हल्ल्यासाठी वापरण्यात आलेल्या शस्त्रांबाबत अद्याप सविस्तर माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, तपास यंत्रणा घटनास्थळावरील पुरावे आणि इतर संबंधित माहिती गोळा करत आहेत. तपास पूर्ण झाल्यानंतरच या गोळीबारामागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे. सध्या या घटनेचा दहशतवादाशी संबंध असल्याचे निश्चित झालेले नाही.


























































