
येत्या 21 जून रोजी ‘नीट’ची फेरपरीक्षा होणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कडक पावले उचलली आहेत. परीक्षा प्रक्रियेची पारदर्शकता आणि विश्वासार्हता कायम ठेवण्यासाठी सरकारने 22 जूनपर्यंत टेलिग्राम प्लॅटफॉर्मवर तात्पुरते निर्बंध लागू केले आहेत. याशिवाय, 30 जूनपर्यंत टेलिग्रामवरील मेसेज एडिट करण्याच्या सुविधेवरही मर्यादा आणण्यात आल्या आहेत.
आगामी नीट (यूजी) 2026 पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर पेपरफुटी आणि फसवणुकीचे रॅकेट रोखण्यासाठी राष्ट्रीय चाचणी संस्थेच्या (एनटीए) थेट शिफारसींनुसार ही तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. एनटीएने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत निवेदनानुसार, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने या प्लॅटफॉर्मवर कठोर, कालबद्ध निर्बंध लागू करण्यासाठी माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 च्या कलम 69अ अंतर्गत आपत्कालीन अधिकारांचा वापर केला आहे.
राष्ट्रीय परीक्षा संस्थेने या निर्णयाचे स्वागत केले असून, गेल्या काही काळात टेलिग्रामचा वापर करून काही टोळ्या नीट उमेदवारांची दिशाभूल करत असल्याचा दावा केला आहे. पेपर लीक झाल्याचे खोटे दावे, बनावट प्रश्नपत्रिका आणि पुनर्परीक्षेबाबत चुकीची माहिती पसरवून विद्यार्थ्यांकडून हजारो ते लाखो रुपये उकळले जात असल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली होती. त्यानंतर एनटीए आणि विविध राज्यांच्या पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार इंडियन सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटरने अनेक टेलिग्राम चॅनेल्स, ग्रुप्स आणि बॉट्सविरोधात कारवाई केली आहे. मात्र, स्वतंत्रपणे चॅनेल्स बंद करूनही गैरप्रकार पूर्णपणे थांबत नसल्याचे लक्षात आल्यानंतर प्लॅटफॉर्म स्तरावर निर्बंध घालण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.
एनटीएचे आवाहन
या निर्बंधांचा परिणाम काही प्रमाणात सर्वसामान्य वापरकर्त्यांवरही होणार असल्याची कबुली एनटीएने दिली आहे. मात्र, हा निर्णय केवळ परीक्षेच्या संवेदनशील कालावधीपुरता असून परीक्षेची निष्पक्षता जपणे हेच त्यामागील प्रमुख उद्दिष्ट असल्याचे संस्थेने स्पष्ट केले आहे. दरम्यान, 21 जून 2026 रोजी होणारी नीट पुनर्परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच पार पडणार असल्याचे एनटीएने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावरील अफवा किंवा अप्रमाणित माहितीकडे दुर्लक्ष करून केवळ अधिकृत सूचनांवर विश्वास ठेवावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.





























































