
मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून दहिसर ते भाईंदर असा 4.58 किमी लांब आणि 45 मीटर रुंदीचा चारपदरी कोस्टल रोड बांधण्यात येत आहे. मात्र या प्रकल्पासाठी तब्बल 52 कोटी 50 लाख रुपये सल्लागारावर खर्च करण्यात येणार आहेत. त्यामुळे नेमणुकीचा प्रस्ताव स्थायी समितीत गाजणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुंबई महानगरपालिकेत गेल्या काही वर्षांपासून प्रत्येक कामासाठी सल्लागार नेमण्यास सुरुवात करण्यात आली. यावर नगरसेवकांकडून वारंवार आक्षेप घेण्यात येत असला तरी पालिकेकडून मात्र सल्लागार नेमणूक सुरूच आहे. यानुसार दहिसर-भाईंदर या उन्नत मार्गासाठी आता मे. निप्पोन कोई इंडिया प्रायव्हेट लिमिटेड व मे काईट अलाईड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांची नेमणूक करण्यात येणार आहे. या मार्गाचे काम आधुनिक पद्धतीने करण्यात येणार आहे. यानुसार सल्लागारावर सर्व संकल्पचित्रे, आराखडे, संरचना यांची तपासणी आणि दैनंदिन देखरेख, प्रकल्पास येणाऱ्या सामग्रीची गुणवत्ता तपासणे, प्रकल्पात नमूद बांधकामाची गुणवत्ता तपासणे अशा जबाबदाऱ्या राहणार आहेत.
असा आहे मार्ग
दहिसर पश्चिम लिंक रोड ते मिरा-भाईंदर पश्चिम महापालिका हद्दीपर्यंत हा मार्ग बांधण्यात येईल. एकूण 4.58 किमीच्या मार्गातील 1.45 किमी मार्ग पालिकेच्या हद्दीत तर 3.13 किमी भाईंदर पालिकेच्या हद्दीमध्ये येणार आहे.
पाच मिनिटांत भाईंदरमध्ये
दहिसर-भाईंदर प्रवास हा अर्धा ते पाऊण तासाचा प्रवास पाच ते सात मिनिटांत होणार आहे. या प्रकल्पासाठी पालिका सुमारे 2337 कोटी रुपये खर्च करणार आहे. 2029 पर्यंत हा मार्ग प्रवाशांच्या सेवेत येईल.

























































