
जगभरात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या मेसेजिंग ॲप ‘व्हॉट्सॲप’ने आपल्या युजर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि सोयीचे फीचर आणले आहे. आता युजर्सना मोबाईल ॲप किंवा डेस्कटॉप ॲप्लिकेशनशिवाय, थेट संगणक किंवा लॅपटॉपवरील वेब ब्राऊझरवरूनच ग्रुप व्हॉईस आणि व्हिडिओ कॉलिंग करता येणार आहे. व्हॉट्सॲपच्या फीचर्सवर लक्ष ठेवणाऱ्या ‘Wabetainfo’ या संकेतस्थळाने ही माहिती दिली आहे. सध्या या फीचरची बीटा व्हर्जनमध्ये (Beta Version) चाचणी सुरू आहे.
व्हॉट्सॲपने यापूर्वीच व्हॉट्सॲप वेबवर वैयक्तिक (Personal) चॅटसाठी व्हॉईस आणि व्हिडिओ कॉलिंगची सुविधा दिली होती. मात्र, यामध्ये ग्रुप कॉलिंगचा पर्याय उपलब्ध नव्हता. आता कंपनी आपल्या वेब ग्रुप कॉलिंग सेवेचा विस्तार करत असून लवकरच हे फीचर सर्वसामान्य युजर्ससाठी उपलब्ध केले जाणार आहे.
या नवीन अपडेटमुळे युजर्सना लॅपटॉप किंवाकॉम्प्युटरवर फक्त ब्राउझर ओपन करून व्हॉट्सॲप वेब सुरू करावे लागेल. ग्रुप चॅटमधील कॉल बटन दाबल्यानंतर युजर्सना ‘व्हॉईस कॉल’ आणि ‘व्हिडिओ कॉल’ असे दोन पर्याय दिसतील. या सुविधेच्या माध्यमातून एकाच वेळी तब्बल 32 जणांना कॉलमध्ये जोडता येऊ शकते. त्यामुळे ऑफिसच्या लहान-मोठ्या मीटिंग्जसाठी युजर्सना आता वारंवार ‘झूम’ (Zoom) किंवा ‘गुगल मीट’वर (Google Meet) लिंक तयार करण्याची गरज नसेल.
स्क्रीन शेअरिंग आणि कॉल लिंकचे अतिरिक्त फीचर्स
केवळ ग्रुप कॉलिंगच नाही, तर आगामी काळात व्हॉट्सॲप वेबवर ‘स्क्रीन शेअरिंग’ (Screen Sharing) आणि ‘कॉल लिंक’ (Call Link) हे फीचर्सही जोडले जाणार आहेत. स्क्रीन शेअरिंग फीचरमुळे मीटिंग दरम्यान युजर्स आपल्या कॉम्प्युटरवरील प्रेझेंटेशन, महत्त्वाची कागदपत्रे किंवा इतर कोणतीही फाईल सहज दाखवू शकतील. यामुळे कार्यालयीन कामांमधील व्हॉट्सॲपचा वापर सोपा होणार आहे.
मोबाईलप्रमाणेच वेब ग्रुप कॉलिंगवरही ‘एंड-टू-एंड एन्क्रिप्शन’ (End-to-End Encryption) चे सुरक्षा कवच मिळेल, असे व्हॉट्सॲपने स्पष्ट केले आहे. कॉलवरील संभाषण पूर्णपणे सुरक्षित असेल आणि ते कॉलिंगमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींशिवाय तिसऱ्या कोणालाही ( अगदी व्हॉट्सॲपलाही ) ऐकता किंवा पाहता येणार नाही. त्यामुळे युजर्सची प्रायव्हसी मेंटेन राहील. हे नवीन अपडेट लवकरच अधिकृतपणे सर्व युजर्ससाठी उपलब्ध होण्याची शक्यताआहे.


























































