
एसटी महामंडळातील अधिकारी पदस्थापनेच्या प्रक्रियेवरून प्रशासकीय कार्यपद्धतीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. विभाग नियंत्रक पदाच्या सुमारे आठ जागा रिक्त आहेत. असे असताना विभाग नियंत्रक पदावर कार्यरत महिला अधिकाऱ्याची नियोजन व पणन विभागातील ‘नियोजन अधिकारी’ पदावर नियुक्ती झाल्याने यावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश परिवहन मंत्र्यांनी दिले आहेत.
सद्यस्थितीत एसटी महामंडळाच्या विविध विभागांत रिक्त पदे आहेत. ती रिक्त पदे वेळीच भरण्याची मागणी जोर धरत असताना नियुक्ती प्रक्रियेत प्रशासकीय निकषांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप होत आहे. नियोजन व पणन विभागातील ‘नियोजन अधिकारी’ पद मागील सात वर्षांपासून रिक्त आहे. या पदावर अचानक विभाग नियंत्रक पदावरील मर्जीतील महिला अधिकाऱयाची नियुक्ती करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यासंदर्भात दलित महासंघाने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे तक्रार केली आहे. संघटनेच्या तक्रारीची गंभीर दखल घेत परिवहन मंत्र्यांनी एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांना तक्रारीतील रिक्त पदे व नियुक्तीसंबंधी आरोपांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
पदस्थापनेवरून वाद
एसटी महामंडळातील पदस्थापनेवरून वाद निर्माण झाला आहे. नियोजन अधिकारी हे पद सात वर्षांपासून रिक्त होते. त्यामुळे संबंधित अधिकाऱयाची सोय व्हावी म्हणून रिक्त पदावर नियुक्ती करणे योग्य होते का, असा प्रश्न तक्रार अर्जातून उपस्थित केला आहे.





























































