गृहमंत्री म्हणून पांडू हवालदार आहात, काँग्रेसचा फडणवीसांना टोला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्रात अराजकता शिगेला पोहचली आहे, कायदा नावाचा विषयच राज्यात शिल्लक राहिलेला नाही अशी टीका करतानाच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्ही घाशीराम कोतवाल आहात आणि गृहमंत्री म्हणून पांडू हवालदार आहात, असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज लगावला.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी रामलीला मैदानावरील ‘इंडिया’ आघाडीच्या रॅलीचे नेतृत्व करणाऱ्या काँग्रेसला चीनने फंडिग केल्याचा आरोप केला होता. त्याला सपकाळ आणि अन्य काँग्रेस नेत्यांनी प्रत्युत्तर दिले. केंद्रीय गृह मंत्रालय ज्यांच्या ताब्यात आहे ते असे आरोप करतात म्हणजे त्यांना सरकार चालवता येत नाही हेच सिद्ध होते, असे सपकाळ म्हणाले.

जनतेऐवजी चोरांच्या भरवशावर सरकार स्थापन करणाऱ्या मुख्यमंत्री फडणवीसांना ‘इंडिया’ आघाडीच्या रॅलीत अराजकता नेमकी कुठे दिसली, असा सवाल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. राहुल गांधी यांच्या नावाची भीती आणि धाक यांच्या डोक्यात घुसल्याने हे अराजकता म्हणत आहेत, चीनकडून फंडिंग घेतो, तर आरोप करण्यापेक्षा पुरावे शोधा, असे वडेट्टीवार म्हणाले.

मुख्यमंत्री फडणवीस नेहमी गोंधळवणारी वक्तव्ये करत असतात, मूळ विषयावर बोलतच नाहीत, असा आरोप काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी केला. मूळ विषय सोडून डायव्हर्स स्टेटमेंट करण्याचा फडणवीस यांचा स्वभाव आहे, असे ते म्हणाले.