
शिवसेनेचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची हत्या होऊन महिना उलटल्यानंतरही हत्येतील मुख्य सूत्रधारांना पोलीस अटक करू शकलेले नाहीत. याबाबत दुसऱयांदा राम पूर्णेकर यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत नाराजी व्यक्त केली. त्यावर या हत्याकांडाचा तपास कोणाच्याही दबावाला बळी न पडता निष्पक्ष आणि पारदर्शकपणे होईल, तुम्हाला न्याय मिळेल, असे आश्वासन त्यांनी दिल्याचे राम यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
प्रदीप पूर्णेकर यांची 29 सप्टेंबरच्या रात्री मानपाडा भागात पाच जणांनी कार्यालयात शिरून निर्घृण हत्या केली होती. या हत्येचे मुख्य सूत्रधार शिंदे गटाच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे हेच आहेत, असा गंभीर आरोप पूर्णेकर कुटुंबाने वारंवार केला आहे. त्यांच्या अटकेची मागणीदेखील पूर्णेकर कुटुंब करत आहे. त्यांची नावे पुरवणी आरोपपत्रात आहेत. त्यांची चौकशीही करण्यात आली. मात्र पुढे काहीच कारवाई करण्यात आलेली नाही. त्या पार्श्वभूमीवर राम यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.
भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी ही भेट झाली. जवळपास अर्धा तास राम यांनी घटनेचा संपूर्ण तपशील मुख्यमंत्र्यांपुढे मांडला. सर्व पुरावे दाखवले.
ठोस पुरावे देऊनही अटक का नाही ?
पुरवणी जबाबात नावे आल्यानंतरही माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांना अद्याप एसआयटी पथकाकडून अटक का करण्यात आली नाही, असा प्रश्न राम यांनी मुख्यमंत्र्यांसमोर उपस्थित केला. त्यावर या हत्येचा तपास सुरू असून कोणत्याही दबावाला बळी न पडता दोषींवर कडक कारवाई केली जाईल. तसेच कोणत्याही आरोपीला पाठीशी घातले जाणार नाही, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले. हा खटला जलदगतीने चालवू, असेही त्यांनी आश्वस्त केल्याचे राम यांनी सांगितले.

































































