जाऊ शब्दांच्या गावा – दिवाळे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>साधना गोरे<<

‘दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा’ यासारख्या शब्दप्रयोगातून लोकांमध्ये दिवाळी सणाचं किती अप्रूप आहे ते दिसतं. पण मानवी मन भाषेचा वापर करताना कोणत्या अनुभवाची सांगड कशाशी घालेल हे सांगता येत नाही. दिवाळी आनंदाचा सण म्हणून त्याच्या इतक्याच आनंदाच्या दसऱ्याच्या सणाशी त्याचा मेळ घालून दसरा-दिवाळीचे शब्दप्रयोग तयार झाले आहेत, तर दुसरीकडे आनंदमय दिवाळीची साधेपणाने साजऱ्या केल्या जाणाऱ्या होळी सणाशी तुलना करून बऱ्याच म्हणीही तयार झालेल्या दिसतात.

तसे तर सगळेच सण आनंदाचे असतात, पण दिवाळी-दसरा हे सण अधिक आनंदाचे मानले गेलेले आहेत. ‘साधूसंत येती घरा, तोचि दिवाळी दसरा’ या अभंगात संत तुकारामांनीही संतभेटीच्या आनंदाची तुलना दिवाळीच्या आनंदाशी केली आहे. दसरा-दिवाळी हे सण ऐन सुगीत येतात. सुगीत फार काम असलं तरी मनासारखं धान्य आल्याने  शेतकरी सुखावलेलाही असतो, त्यामुळे त्याचं मन काहीसं सैलावतं, आळसावतं. त्याचीही ही मनःस्थिती कथन करणारी म्हण म्हणजे ‘दिवाळी दसरा, हातपाय पसरा.’ नवरात्रीत उपवासाचा सात्त्विक आहार करून तोंड अळणी झालेलं असतं. त्यामुळे दसऱ्याला महाराष्ट्रातील बऱ्याच भागात देवाला बोकड कापून झणझणीत मांसाहार खाण्याची पद्धत आहे. तेव्हा या दिवसांत दावणीच्या बोकडाचे काय विचार असतील याविषयीही एक म्हण आहे – ‘दसऱ्यातून जगू तेव्हा दिवाळीचा दिवा बघू.’  सध्याच्या संकटातून सहीसलामत बाहेर पडलो तरच पुढील सुख अनुभवता येईल, या अर्थाने ही म्हण वापरली जाते.

दिवाळी हा भरभराटीचा, चैनीचा सण आहे. म्हणून तर एखादा चंगळ करत असेल तर ‘तुझी दिवाळी आहे’ असं म्हटलं जातं किंवा एखादा रोजच सुखात लोळत असेल तर ‘राजाला रोजच दिवाळी’ असा शब्दप्रयोग केला जातो. याउलट शिमग्यात म्हणजे होळीत बोंब मारली जाते आणि बोंब मारणं हे दारिद्रय़ाचं, अभावाचं लक्षण आहे. यावरून जवळ धन असेल तोवर चैन करायची, नसेल तेव्हा बोंब मारायची या अर्थाने ‘असेल तेव्हा दिवाळी, नसेल तेव्हा शिमगा’ असं म्हटलं जातं. दिवाळी-शिमग्याच्या सणांचा विशेष सांगणारी आणखीही एक म्हण आहे – ‘आधी दिवाळी मग शिमगा.’ शालिवाहन कालगणनेनुसार आधी दिवाळी येते आणि वर्षाच्या अखेरीस शिमगा येतो. दिवाळीचे दिवस तसेही सुगीचे, अर्थात चैनीचे, तर वर्षाच्या शेवटी येणाऱ्या शिमग्यात सर्व खडखडाट होतो. यावरून सुबत्ता असेल तेव्हा ऊतमात केली तर शेवटी हालच वाटय़ाला येणार, या अर्थाने ही म्हण वापरली जाते. तसंच दारिद्रय़ आणि श्रीमंती प्रत्येक समाजात असते हे सांगताना ‘एकाची दिवाळी तर दुसऱ्याची होळी’ असंही म्हटलं जातं. एखादा घरी अभावाचे जगत असला तरी बाहेर वावरताना तो तसं न दाखवता आपण चैनीत असल्याचं भासवत असेल, तर अशा व्यक्तीच्या संदर्भात ‘घरात शिमगा, बाहेर दिवाळी’ असं म्हटलं जातं. काही व्यक्तींना इतरांकडून काही घेताना आनंद होतो. मात्र इतरांसाठी काही करताना त्यांचा हात आखडतो, अशा व्यक्तींना उद्देशून ‘घेताना दिवाळी, देताना शिमगा’ म्हणण्याची पद्धत आहे. राजा सुखात राहावा म्हणून प्रजेला कष्ट घ्यावे लागतात किंवा प्रजेला नागवून राजा सुख भोगत असतो हे सांगण्यासाठी ‘प्रजेची होळी अन् राजाची दिवाळी’ ही म्हण वापरली जाते.

‘ज्याच्या घरी काळी, त्याची सदा दिवाळी’ अशी एक मजेशीर आणि संदर्भ माहीत नसला तर अर्थाच्या अनेक शक्यता व्यक्त करणारी म्हण आहे. म्हैस रंगाने काळी असते, म्हशीचं दूध गायीच्या दुधाहून घट्ट असतं. त्यावरून दूधदुभतं खायची चंगळ होईल या अर्थाने ही म्हण वापरली जाते.

एखाद्याचा उद्योग तोटय़ात गेला की, ‘दिवाळे निघाले’, ‘दिवाळे वाजले’ असा शब्दप्रयोग केला जातो. खर्चिक, उधळ्या मनुष्याला ‘दिवाळखोर’ म्हटलं जातं. हिंदी, सिंधी, कानडी या भाषांमध्येही याच अर्थाने हा शब्दप्रयोग केला जातो. मात्र या ‘दिवाळे’चा दिवाळी सणाशी काही संबंध नाही, किंबहुना या शब्दप्रयोगाची समाधानकारक व्युत्पत्ती कुठंही आढळून आली नाही. ‘व्युत्पत्ति कोश’ आणि ‘महाराष्ट्र शब्दकोश’ दोन्हींमध्ये म्हटलं आहे – कर्जबाजारी मनुष्य आपल्या घरात, दुकानात खिडकीत शेणाचा दिवा लावून तिथून निघून जातो. दिव्याच्या शेजारी तो आपल्या हिशेबाच्या वह्या ठेवतो. तो गेल्यानंतर त्याचे धनको येतात व त्याच्या वह्या पाहून त्याला ऋण परत करण्याचे सामर्थ्य नाही असे समजतात. या पद्धतीवरून हा शब्द रूढ झाला असावा. मात्र कृ. पां. कुलकर्णींनी ही व्युत्पत्ती संशयास्पद वाटत असल्याचंही म्हटलं आहे. त्यासाठी वाजणे, काढणे, निघणे अशी विविध क्रियापदे प्रचारात असल्याने नेमकी व्युत्पत्ती सांगताना संभ्रम निर्माण होतो.