कुलगुरूंची गाडी अडवणाऱ्या विद्यार्थ्यांवर गुन्हा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू आणि कुलसचिव यांची गाडी अडवून घोषणाबाजी केल्याप्रकरणी १५ ते २० विद्यार्थ्यांवर चतुःशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी (४ रोजी) सायंकाळी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या आवारात हा प्रकार घडला. याप्रकरणी विद्यापीठाच्या ५५ वर्षीय सुरक्षा पर्यवेक्षकाने पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी आणि कुलसचिव प्रफुल्ल पवार हे कार्यालयातून बाहेर पडून शासकीय वाहनाने निवासस्थानाकडे जात होते. त्यावेळी विद्यार्थी संघटनेच्या १५ ते २० कार्यकर्त्यांनी विनापरवानगी बेकायदेशीरपणे जमाव जमवून घोषणाबाजी केली. तसेच त्यांचे वाहन अडवून त्यांना घेरले.

विद्यार्थ्यांच्या आक्रमकतेमुळे कुलगुरू आणि कुलसचिवांना अखेर गाडी तेथेच सोडून पायी घरी जावे लागले. शासकीय कर्तव्य बजावत असताना अडथळा निर्माण केल्याप्रकरणी पोलिसांनी संबंधित विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

नेमके प्रकरण काय?

पुणे विद्यापीठाच्या आवारात विद्यार्थ्यांनी केवळ विद्यापीठाशी संबंधित आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत आंदोलन करावे, असा ठराव विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेमध्ये करण्यात आला. त्यावर विविध विद्यार्थी संघटनांनी आक्षेप घेऊन आंदोलन केले. याबाबत व्यवस्थापन परिषदेेत चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना प्रशासनातर्फे सांगण्यात आले होते. या आश्वासनानंतर संघटनांनी आंदोलन स्थगित केले. मात्र, बुधवारी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत आंदोलनानंतर निर्बंध आणणारे पत्रक रद्द केले नाही. त्यामुळे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीबाहेर कुलगुरू आणि कुलसचिवांच्या गाडीसामोर विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केले.