
ज्येष्ठ शास्त्रज्ञ, पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांना ‘साहित्य शिरोमणी स्व. गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळुसकर स्मृती पुरस्कार’ जाहीर झाला आहे. नाईक मराठा मंडळाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त 22 नोव्हेंबर रोजी मुंबईत विशेष सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्यावेळी डॉ. माशेलकर यांना हा प्रतिष्ठsचा पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात येणार आहे.
डॉ. माशेलकर यांनी विज्ञान, संशोधन, शिक्षण व राष्ट्रउभारणीच्या क्षेत्रात आपल्या असामान्य कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. त्यांच्या बहुमोल योगदानाचा गौरव म्हणून नाईक मराठा मंडळाने त्यांना साहित्य शिरोमणी गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळुसकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पहिला पुरस्कार जाहीर केला आहे. नाईक मराठा मंडळ मुंबईसह ठाणे आणि सिंधुदुर्ग जिह्यात शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करीत आहे.
साहित्य शिरोमणी कृष्णराव अर्जुन केळुसकर यांनी शिक्षण, साहित्य, समाजप्रबोधन, सामाजिक परिवर्तन तसेच कामगार क्षेत्रात केलेले कार्य अत्यंत मोलाचे आहे. त्यांनी पहिले शिवचरित्र, बुद्धचरित्र, संत तुकाराम चरित्र आणि भगवद्गीतेसह सात हजार पानांचे विविध विषयांवर लिखाण केले. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा पुरस्कार डॉ. माशेलकर यांच्यासारख्या ज्ञानसाधकाला प्रदान होणे ही अभिमानाची बाब मानली जात आहे.




























































