दिवाळीच्या खरेदीचा ‘संडे’ धमाका, दादरच्या बाजारपेठेत तुडुंब गर्दी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील मध्यवर्ती बाजारपेठ असलेल्या दादरच्या बाजारपेठेत रविवारी दिवाळी खरेदीचा प्रचंड उत्साह होता. दिवाळी अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपल्याने हजारो मुंबईकरांनी खरेदीसाठी तुडुंब गर्दी केली होती. दादर बाजारपेठेतील सर्वच गल्ल्यांमध्ये ग्राहकांची वर्दळ होती. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत बाजारपेठ अक्षरशः गर्दीने फुलली होती. महागाईचे सावट असूनही मुंबईकरांनी दिवाळी खरेदीचा पारंपरिक उत्साह कायम ठेवला.

दिवाळी सणापूर्वीचा शेवटचा रविवार म्हणून मुंबईकरांची दादरमध्ये अलोट गर्दी झाली होती. पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गावरील प्रवाशांना दादर स्थानक मध्यवर्ती आणि सोयीचे ठरते. त्यामुळे प्रतिवर्षीप्रमाणे यंदा ग्राहकांनी खरेदीसाठी दादर गाठले होते. बहुतांश मुंबईकरांनी कुटुंबीयांसह हजेरी लावली होती. दादर पूर्वेकडील हिंदमाता परिसरात कपडे खरेदीसाठी गर्दी झाली होती, तर पश्चिमेकडे सर्वच प्रकारच्या खरेदीचा उत्साह दिसला. प्रत्येक दुकानाबाहेर ग्राहकांच्या रांगा लागल्या होत्या. बहुतांश व्यापाऱयांनी आकर्षक सवलती जाहीर केल्या होत्या. त्याचा लाभ उठवण्यासाठी झुंबड उडाली. अनेक महिलांनी सोनेखरेदीला पसंती दिली. त्यामुळे सराफा व्यापारात तेजी संचारली होती. ग्राहकांच्या प्रचंड गर्दीमुळे सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेत पोलीस प्रशासनाने सर्वतोपरी खबरदारी घेतली होती. पोलिसांनी गस्त घालून गर्दीतील अनुचित प्रकारांना पायबंद घालण्याचा यशस्वी प्रयत्न केला. याचवेळी वाहतूक कोंडी सोडवण्याचे आव्हान पोलिसांपुढे होते.

सर्वत्र विद्युत रोषणाईची झळाळी

दादर बाजारपेठेसह उपनगरांतील बाजारपेठांमध्ये दिवाळीनिमित्त उत्साहाचे वातावरण संचारले आहे. रंगीबेरंगी फुले, रांगोळी, फटाक्यांबरोबर झगमगते कंदील, विद्युत रोषणाई तसेच इतर सजावटीच्या साहित्यांनी बाजारपेठांना नवी झळाळी प्राप्त झाली आहे. रंगीबेरंगी फुलांच्या माळा, रांगोळीचे रंग, झगमगते कंदील, दिवे, पणत्या, तोरण, रांगोळीचे साचे आदी साहित्य खरेदीसाठी ग्राहकांची रीघ लागली आहे.

परळ ते माहीम वाहतूककोंडी

प्रभादेवीचा पूल बंद असल्यामुळे सलग दुसऱया वर्षी दिवाळीच्या दिवसांत वाहतूककोंडीचे विघ्न कायम राहिले आहे. दिवाळी खरेदीनिमित्त दक्षिण-मध्य मुंबईत वाहनांचे प्रमाण वाढले आहे. या वाहनांची संख्या रविवारी काही पटींनी वाढली होती. त्यामुळे दादरबरोबरच एकीकडे परळ आणि दुसरीकडे माहीमपर्यंत ठिकठिकाणी वाहतूककोंडी झाली होती.