
अर्धा जून संपला तरी पाऊस पडलेला नाही. त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांनी तळ गाठला असून 10 टक्केच पाणी शिल्लक आहे. त्यामुळे आगामी काळात पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यासाठी मुंबईतील बांधकामे, जलतरण तलावांचा पाणीपुरवठा उद्यापासून बंद करण्यात येणार आहे, तर औद्योगिक-व्यापारी आणि स्पोर्टस् क्लबमध्ये 20 टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे. मुंबईत आता प्राधान्याने आंघोळीला आणि प्यायलाच पाणी मिळणार आहे.
जलअभियंता विभागाने पाणीकपातीच्या कालावधीत करावयाच्या उपाययोजनांबाबत परिपत्रक जारी केले आहे. मुंबईला सध्या प्रतिदिन 4 हजार 664 दशलक्ष लिटर इतकी पाण्याची आवश्यकता आहे. मात्र उपलब्ध पर्यायामधून मुंबई महानगराला प्रतिदिन सरासरी 4 हजार 100 दशलक्ष लिटर पाणी मिळत आहे. सध्या मुंबईत 10 टक्के पाणीकपात आहे.
मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे, आरसीएफ, एचपीसीएल, बीपीसीएल, नेव्ही, एमआयडीसी आदी आस्थापनांनी दुय्यम वापरासाठी व परिचालनासाठी कुलाबा आणि इतर सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पातील प्रक्रियायुक्त पाण्याचा फेरवापर करावा, असे निर्देशही परिपत्रकाद्वारे देण्यात आले आहेत.
धरणांतील शिल्लक पाणीसाठा (दशलक्ष लिटरमध्ये)
- मोडक सागर 39308
- तानसा 7447
- मध्य वैतरणा 20241
- भातसा 69133
- विहार 11745
- तुळशी 1877
गैरवापर केल्यास कारवाई
पालिकेकडून पुरवण्यात येणाऱ्या पिण्याचा पाण्याचा गैरवापर केल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पालिकेने दिला.
जलजोडणीधारकांकडून वाढीव जलजोडणी, अतिरिक्त जलजोडणीकरिता अर्ज प्राप्त झाल्यास पुरेसा पाणीसाठा तयार होईपर्यंत मागणी प्रलंबित ठेवणार.
पॅकेज वॉटर बॉटलिंग प्लँटला दिलेल्या जलजोडण्यांतून होणारा पाणीपुरवठा तेथील कामगारांच्या पिण्याच्या पाण्याच्या गरजेइतका कमी करण्यात येणार आहे.
पर्यायांचा वापर करा!
पाण्याच्या कमतरतेमुळे सार्वजनिक स्वच्छतागृह व प्रसाधनगृह सांभाळणाऱ्या संस्थांनी जास्तीत जास्त टँकर किंवा बोअरवेलच्या पाण्याचा वापर करावा व पिण्याच्या पाण्याची बचत करावी.
पिण्याव्यतिरिक्त इतर वापरासाठी विहिरी, कूपनलिका यांचा जास्तीत जास्त वापर करावा. वाहन धुणे, रस्ता, परिसर धुण्यासाठी बोअरवेल अथवा विहिरीच्या पाण्याचा वापर करावा.






























































