
पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणाचा निकाल पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आला. हत्याकांड प्रकरणात आज कोर्टात निकाल लागणार होता. मात्र, निकाल तयार करण्यासाठी आणखी काही दिवसांची गरज आहे, असे स्पष्ट करत न्यायाधीशांनी हा निकाल पुढे ढकलला. मुख्य शूटर पिंटू चौधरी (पिंटू सिंह) याला प्रत्यक्ष कोर्टात हजर न केल्याने विशेष न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलली आहे.
3 जून 2006 रोजी मुंबईवरून धाराशिवला जात असताना नवी मुंबईच्या कळंबोलीत राजकीय वादातून पवनराजे निंबाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. गोळीबारात पवनराजेंचा चालक समद काझी याचादेखील मृत्यू झाला होता. कोर्टात आलेल्या ओमराजे निंबाळकर यांनी सुनावणीनंतर माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, आमच्या दोन्ही कुटुंबानी 20 वर्षे 13 दिवस संघर्ष केला आहे, त्यामुळे आम्हाला न्याय मिळेल एवढीच अपेक्षा आहे. सामान्य माणसाला न्याय मिळवण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागतो, असे ते म्हणाले.

























































