
श्रीक्षेत्र भीमाशंकर देवस्थानने व्हीआयपी दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता मंदिरात व्हीआयपी दर्शन बंद असणार असून यापुढे सर्व भाविकांसाठी समान नियम लागू राहणार आहे. तसेच ऑनलाईन बुकिंगशिवाय दर्शनासाठी प्रवेश मिळणार नाही.
भीमाशंकर देवस्थान प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी किंवा इतर कोणत्याही व्हीआयपी व्यक्तीसाठी स्वतंत्र दर्शन व्यवस्था उपलब्ध राहणार नाही. सर्व भाविकांना एकाच नियमातून दर्शनाची सुविधा मिळणार आहे. दर्शन व्यवस्थेत समानता आणि पारदर्शकता आणण्याच्या उद्देशाने हा निर्णय लागू करण्यात आला.



























































