मंगेश कुडाळकर यांची आमदारकी धोक्यात, निवडणूक याचिकेवर 1 जुलैला सुनावणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिंदे गटाचे आमदार मंगेश कुडाळकर यांनी अनैतिक मार्गाने निवडणूक जिंकली असा दावा करत शिवसेनेने त्यांच्या निवडीला हायकोर्टात आव्हान दिले आहे. या याचिकेच्या सुनावणीसाठी आज न्यायालयात निवडणूक अधिकाऱ्यांकडून कोणीच उपस्थित न राहिल्याने हायकोर्टाने या प्रकरणाची सुनावणी 1 जुलै रोजी निश्चित केली आहे.

कुर्ला विधानसभा मतदारसंघाचे शिंदे गटाचे आमदार मंगेश कुडाळकर यांच्या विरोधात शिवसेनेच्या उमेदवार प्रवीणा मोरजकर यांनी याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज मंगळवारी न्यायमूर्ती शिवकुमार दिघे यांच्या एकलपीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी मोराजकर यांच्या वतीने अॅड. दिलीप साटले उपस्थित होते. सुनावणीवेळी न्यायालयात निवडणूक अधिकाऱ्यांच्या वतीने वकील उपस्थित नसल्याने न्यायालयाने याचिकेवरील सुनावणी 1 जुलै रोजी निश्चित केली तसेच पुढील सुनावणीवेळी निवडणूक आयोगाकडून कोणीही उपस्थित नसल्यास त्यांच्या अनुपस्थित सुनावणी घेतली जाईल असा इशारा न्यायालयाने यावेळी दिला.