
कोल्हापूरकरांसाठी आनंदाची बातमी आहे. वनतारातील वर्षभराच्या उपचारानंतर त्यांची लाडकी माधुरी हत्तिणीच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून लवकरच ती स्वगृही परतणार आहे.
दोन दिवसांपूर्वी वनताराची तज्ञ टीम नांदणीत दाखल झाली होती. माधुरीaच्या निवासासाठी आवश्यक सोयी-सुविधांची या टीमने पाहणी केली. नांदणी मठ परिसरात व्यवस्था पूर्ण झाल्यानंतर माधुरीला पुन्हा मठात आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मठाच्या वतीने सोशल मीडियावर पोस्ट करून यास दुजोरा देण्यात आला.
माधुरी हत्तिणीला 30 जुलै 2025 रोजी वनतारामध्ये नेण्यात आले होते. त्यावेळी कोल्हापूर जिह्यासह राज्यभरातून लाखो नागरिकांनी तिच्याविषयीच्या भावना व्यक्त केल्या होत्या. गेल्या वर्षभरापासून तिच्या पुनरागमनासाठी प्रयत्न सुरू होते.
माधुरीच्या तब्येतीत सुधारणा व्हावी यासाठी तिला जंगलात फिरायला नेऊन पर्यावरणाशी ओळख करून देण्यात आली. तिला हुंगून झाडपाला शोधण्याची व खाण्याची संधी देण्यात आली. शरीराचे तापमान थंड राहावे यासाठी तिला पाण्यात खेळवणे, हालचाली व्यवस्थित व्हाव्यात यासाठी मातीच्या जमिनीवर झोपवणे, धुळीचे स्नान, चिखलाचा लेप आदी गोष्टीही करण्यात आल्या. माधुरी इतर हत्ती किंवा इतर प्राण्यांमध्ये मिळून मिसळून राहावी, त्यांच्यातील मैत्रीचे बंध दृढ व्हावेत याकडेही तिची काळजी घेणाऱ्या पथकाचे लक्ष होते.

























































