वसई आरटीओला ‘लक्ष्मीदर्शन’ वाहन खरेदीतून १४ कोटींचा महसूल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दसऱ्याच्या मुहूर्तावर वसई आरटीओला यंदा विक्रमी ‘लक्ष्मीदर्शन’ झाले आहे. नवीन वाहन खरेदीमुळे वसई प्रादेशिक परिवहन विभागाला तब्बल १४ कोटी ५१ लाख ६७ हजार ६२० रुपयांचा महसूल मिळाला. यात सर्वाधिक ८ कोटी १८ लाख २३ हजार ८७६ रुपयांचा महसूल केवळ कारच्या नोंदणीतून जमा झाला आहे.

वसई प्रादेशिक परिवहन कार्यालयात मागील वर्षी ३ हजार १०५ वाहनांची नोंदणी झाली होती. यंदा हा आकडा ४ हजार ७५९ वर पोहोचला आहे. त्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत यंदा सुमारे १ हजार ६५० हून अधिक वाहनांची अतिरिक्त नोंदणी झाली आहे. यंदा नोंदणी झालेल्या वाहनांमध्ये २ हजार ५५२ दुचाकी व स्कूटर्सचा समावेश आहे. याशिवाय ७८८ वजड वाहने, ६३९ मोटार कार, २१५ प्रवासी टॅक्सी आणि १५५ बसेसची नोंदणी करण्यात आली आहे.

डंपर, क्रेन, रुग्णवाहिकांची खरेदी

तीनचाकी वाहनांमध्ये ३६ प्रवासी रिक्षांचा समावेश आहे. तसेच १९ मालवाहू तीनचाकी वाहने, १ खाजगी तीनचाकी, २६ डंपर, २१ एक्सकेवेटर, १४ बांधकामासाठी सामान वाहने, ११ क्रेन वाहने, ५ शेती ट्रॅक्टर आणि ३ रुग्णवाहिकांची नोंदणी झाली आहे.

चारचाकीमधून सर्वाधिक कमाई

नवीन वाहनांच्या नोंदणीतून एकूण १४ कोटी ५१ लाख ६७ हजार ६२० रुपयांचा महसूल मिळाला आहे. यामध्ये मोटार कारच्या नोंदणी शुल्काचा सर्वाधिक वाटा असून कार नोंदणीतून सुमारे ८ कोटी १८ लाख २३ हजार ८७६ रुपयांचा महसूल तिजोरीत जमा झाला आहे.