बोलीभाषेची समृद्धी – मराठवाडी बोली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

<< वर्णिका काकडे

मराठवाडीबोली ही महाराष्ट्रातील ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि साहित्यिकदृष्ट्या अत्यंत समृद्ध असणाऱ्या मराठवाडा प्रदेशात बोलली जाणारी प्रमुख लोकबोली आहे. संत साहित्याचा उगम आणि विकास ज्या भूमीत झाला, त्या मराठवाड्याची ही भाषा मानली जाते.

मराठवाडी बोली ही प्रमाण मराठीच्या बरीच जवळ जाणारी असली तरी तिच्यातील लय, ठसका आणि शब्दसंग्रहामुळे तिचे एक स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण अस्तित्व स्पष्ट जाणवते.

मराठवाडी बोलीची भौगोलिक व्याप्ती जाणून घेताना, या बोलीचा विस्तार प्रामुख्याने आठ जिह्यांमध्ये दिसून येतो. छत्रपती संभाजीनगर, जालना, बेड, परभणी, हिंगोली, नांदेड आणि धाराशिव या जिह्यांमध्ये या बोलीचा प्रभाव दिसून येतो. सीमाभागावर बोलीचा प्रभाव दिसताना पश्चिमेकडे अहमदनगर, नाशिक सीमाभागात पोरी खानदेशी छटा दिसतात तर उत्तरेकडे बुलढाणा, वाशिम भागाकडे वऱ्हाडी बोलीचा प्रभाव दिसून येतो. तसेच दक्षिणेकडे कन्नड आणि तेलगू भाषेचे मिश्रण पाहायला मिळते.

मराठवाडी बोलीची स्वतःची अशी काही विशिष्ट व्याकरणिक आणि उच्चारगत वैशिष्ट्ये आहेत. जसे न्हंई आणि आन यांचा वापर. नाही ऐवजी न्हंई किंवा नाय असा उच्चार, आणि या अव्ययाऐवजी आन या शब्दाचा वापर दिसून येतो. यात क्रियापदांचीही खास रूपे दिसून येतात. करतो ऐवजी करतोय, करत्ये, जातो ऐवजी जातोय, जात्ये, आले आहेत ऐवजी अल्यात, आल्याती, चाललो आहे ऐवजी निघालोय, निघालोतो असे शब्दप्रयोग वापरले जातात.

मराठवाडी बोलीत शब्दसंग्रह अतियश रसरशीत आणि गावरान ढंगाचा आहे. जसे की, खूप, भरपूर ऐवजी लई, अफाट, गप्प बस ऐवजी गप बूड! डोकं ऐवजी डोस्कं असे वेगळे शब्द या बोलीत आहेत.

मराठवाडी बोलीला भाषिकदृष्ट्या संत साहित्याने मोठा सन्मान बहाल केला आहे, असे म्हणावे लागेल इतकी विपुल संपदा या भूमीत निर्मित झाली आहे. मराठवाड्यातील माणसाच्या खणखणीत स्वाभिमानाची आणि आपुलकीची अशी बोली लोकसंस्कृतीला समृद्ध करते.